
गोव्याच्या दारूवर महाराष्ट्राचे लेबल; तेलाच्या नावाखाली सुरु होती तस्करी, वैभववाडीत 41 लाखांचा मुद्देमाल जप्त
गोवा बनावटीच्या देशी दारुच्या बाटल्यांवर महाराष्ट्राचे लेबल लावून होणाऱ्या दारु तस्करीचा वैभववाडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक आणि त्याचा मदतनीस याला ताब्यात घेण्यात आले आहे.करुळ तपासणी नाक्यावर पहाटे साडे तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ४१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी ट्रक चालक राकेश राजू हडपद आणि मदतनीस निलेश साहेबराव साळुंखे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची नोटीसवर सुटका करण्यात आली. त्यांच्याकडून २३.५२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, १८ लाख रुपये किंमतीचा (एमएच ०९ – सीव्ही – ६२६२) ट्रक देखील ताब्यात घेण्यात आला आहे. वैभववाडी पोलिसांनी केलेली ही कारवाई आजवरची सर्वात मोठी कारवाई आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करुळ नाक्यावर वैभववाडी पोलिसांनी संशयित ट्रकची चौकशी केली. चालकाला विचारणा केली असता त्याने ट्रकमध्ये तेलाचे डबे असल्याचे सांगितले. डबे तपासून पाहिले असता त्यात गोवा बनावटीच्या मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. धक्कादायक बाब म्हणजे या दारुच्या बाटल्यांवर महाराष्ट्राचे लेबल लावण्यात आले होते.