
आस्थातील श्रवण व वाचादोष शिबिराचा 29 लाभार्थ्यांनी घेतला लाभ
* दिनांक 20 जुलै 2025 रोजी आस्थामध्ये श्रवण व वाचादोष असणाऱ्या सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल पवई, मुंबई व आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी या दिव्यांगांसाठी समर्पित संस्थेकडून करण्यात आले होते. जन्मतः व जन्मपश्चात श्रवणदोष असणाऱ्या, किंवा अस्पष्ट बोलणाऱ्या, बोलतांना अडचण येणाऱ्या अशा सर्व बालकांसाठी व त्यांच्या पालकांसाठी तसेच मोठया वयोगटातील व्यक्तींसाठी मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन सकाळी 09 ते दु. 03 या वेळेत “आस्था थेरपी सेंटर” परकार हॉस्पिटल समोर,शिवाजीनगर, रत्नागिरी येथे करण्यात आले होते.

या शिबिरात श्रवण व वाचा दोष संदर्भात तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना आवश्यक असणाऱ्या संदर्भ सेवा व त्यांच्या पालकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. या शिबिरात प्रसिद्ध कान, नाक, घसा तज्ञ डॉ. कश्मिरा चव्हाण व ऑडिओलॉजिस्ट श्रीम. प्राजक्ता भोगटे-सातवसे यांनी मुलांच्या ऐकण्या व बोलण्या संदर्भातील समस्यांबाबत मार्गदर्शन केले. ऑडिओलॉजिस्ट प्राजक्ता भोगटे-सातवसे यांच्या मार्फत गरजेनुसार OAE, BERA, PTA या वैयक्तिक तपासण्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आस्था फिरते श्रवण चाचणी कक्षात ना नफा ना तोटा तत्वावर शुल्क आकारून करण्यात आल्या.

डॉ. कश्मीरा चव्हाण यांनी मोफत कान नाक घसा या समस्यांबाबत तपासणी व मार्गदर्शन केले. तसेच गरजेनुसार मोफत औषधे व चार दिव्यांगांना श्रवण यंत्र देण्यात आले. या शिबिराचा एकूण 29 लाभार्थ्यांनी लाभ घेतला. शिबिराचे आयोजन व सहाय्यक म्हणून स्पीच थेरपिस्ट श्री संकेत चाळके व तांत्रिक सहाय्यक श्री कल्पेश साखरकर यांनी काम पाहिले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी आस्थाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
