
रा. भा. शिर्के प्रशालेत सायबर जागरूकता मोहीम.
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा. भा. शिर्के प्रशालेत सायबर जागरुकता मोहीम नुकतीच घेण्यात आली. गोगटे-जोगळेकर कॉलेज रत्नागिरीच्या सायबर वॉरियर क्लबतर्फे आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या सहकार्याने “सायबर सुरक्षेसाठी सायबर शिक्षण” ही सायबर मोहीम राबवण्यात आली.विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांबद्दल माहिती देणे, त्यांना डिजिटल जागरुक नागरिक बनवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमात OTP फसवणूक, गेमिंग फ्रॉड, सोशल मीडिया फसवणूक यांसारख्या सायबर गुन्ह्यांवर आधारित माहितीपूर्ण सादरीकरण, संवादसत्र आणि प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले.
कार्यक्रमात सायबर वॉरियर क्लबचे सदस्य पार्वती रावल, संस्कृती जाधव, चिन्मय सुर्वे, सचिन राठोड, वैष्णवी शिरसाट, स्नेहा भिडे, वेदांग पाटणकर, राज गुरव, वैष्णवी गुरव, चिरायु चव्हाण, मिहीर सावंत, श्रेयस चव्हाण यांनी सायबर गुन्हे टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या सावधगिरीच्या उपायांची माहिती प्रभावीपणे दिली. त्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना रोजच्या डिजिटल व्यवहारात कोणती काळजी घ्यावी हे समजून सांगण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा शपथ घेतली आणि डिजिटल माध्यमात जबाबदारीने वागण्याची प्रतिज्ञा केली. विद्यार्थ्यांना सायबर जागरुकतेचे शिक्षण मिळणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे मत शिर्के प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. कांबळे यांनी व्यक्त केले.