
वडाळा – गेट वे भुयारी मेट्रो ११’साठी २,२०० हून अधिक झाडांवर कुऱ्हाड, तर ७९६ बांधकामांवर हातोडा!
*मुंबई :* मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) ‘वडाळा – गेट वे ऑफ इंडिया भुयारी मेट्रो ११’ मार्गिकेचे संरेखन आणि पर्यावरणीय, सामाजिक प्रभाव मूल्यांकन अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार १७.५१ किमीच्या या मार्गिकेसाठी २ हजार २०० हून अधिक झाडे कापावी अथवा पुनर्रोपित करावी लागणार आहेत. त्याचवेळी दुसरीकडे या मार्गिकेच्या कामात आणिक आगार ते भेंडी बाजारदरम्यानच्या तब्बल ७९६ बांधकामांवर हातोडा पडणार असून यात ८०१ कुटुंबे बाधित होणार आहेत. बाधित होणारी सर्वाधिक बांधकामे वडाळ्यातील आहे. वडाळ्यातील ३२४ बांधकामे पूर्णत: बाधित होणार आहेत. त्याचबरोबर भेंडी बाजारातील २०५ बांधकामे बाधित होणार आहे.
एमएमआरसीकडून मेट्रो ११ मार्गिकेची उभारणी केली जाणार आहे. त्यानुसार या मार्गिकेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे याआधीच मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावास मंजुरीची प्रतीक्षा आहे. आता एमएमआरसीने या मार्गिकेचे संरेखन आणि पर्यावरणीय, समाजिक प्रभाव मूल्यांकन अभ्यासाचा अहवाल सर्वसामान्यांसाठी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. या अहवालावर नागरिक, संस्थांकडून सूचना-हरकती मागविण्यात आल्या आहेत. २० ऑगस्टपर्यंत नागरिकांना सूचना-हरकती नोंदविता येणार आहेत. एमएमआरसीच्या मेट्रो ११ च्या अहवालानुसार मेट्रो स्थानक, कारशेड, लाॅन्चिंग शाफ्ट अशा विविध कामांसाठी १७.५१ किमी दरम्यानची २ हजार २०० हून अधिक झाडे बाधित होणार आहेत. यातील काही झाडे कापावी लागणार असून काही झाडे पुनर्रोपित केली जाण्याची शक्यता आहे. स्थानकांच्या प्रवेशद्वारासाठी आणि आणिक आगार येथील कारशेडसाठी सर्वाधिक झाडे कापली जाण्याची शक्यता आहे. बाधित होणाऱ्या झाडांच्या बदल्यात एमएमआरसीकडून नियमानुसार वृक्षारोपण, वनीकरण आणि पुनर्रोपण केले जाणार आहे.
*मेट्रो ११ मार्गिकेसाठी २,०३,५२७ चौ. मीटरपैकी काही जागा कायमस्वरूपी, तर काही जागा तात्पुरती संपादित करावी लागणार आहे. यापैकी २३,५०० चौ. मीटर जागा खासगी आहे. मेट्रो ११ प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरीची आवश्यकता नसली तरी ही मार्गिका सीआरझेड क्षेत्रातून जात असल्याने सीआरझेडशी संबंधित मंजुरी घेणे आवश्यक असणार आहे. मेट्रो ११ मार्गिकेत २ हजार २०० हून अधिक झाडांबरोबरच ७९६ बांधकामेही बाधित होणार आहेत. कारशेडसाठी आणिक आगार येथील १५५ बांधकामे, वडाळा आगार स्थानकासाठी ३२४ बांधकामे, गणेशनगर स्थानकांसाठी १ बांधकाम, शिवडी स्थानकासाठी ६ बांधकामे, हे बंदर स्थानकासाठी ४ बांधकामे, दारुखाना स्थानकासाठी १ बांधकाम, भायखळा स्थानकासाठी १२ बांधकामे, नागपडा स्थानकासाठी ९३ बांधकामे, भेंडीबाजार स्थानकासाठी २०५ बांधकामे अशी एकूण ७९६ बांधकामे मेट्रो ११ साठी बाधित होत आहेत. तर यातील ५९० बांधकामे निवासी असून उर्वरित अनिवासी बांधकामे आहेत. या बाधित होणाऱ्या बांधकामाअंतर्गत ८०१ कुटुंब बाधित होणार आहेत. दरम्यान, बाधित बांधकामांमध्ये चार प्रार्थनास्थळांचाही समावेश आहे. यात दोन जैन मंदिरे, एक हनुमान मंदिर आणि एक बौद्ध विहार आहे. भेंडी बाजार येथील बाधित होणारी दोन जैन मंदिरे २०० वर्षे जुनी आहेत. त्यामुळे प्रार्थनास्थळे, बांधकामे विस्थापित करण्यासह २ हजार २०० हून अधिक झाडे कापणे, पुनर्रोपित करणे हे मोठे आव्हान एमएमआरसीसमोर आहे.