
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा व्यवसाय ५ हजार कोटींवर : अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे बँकेची सर्वसाधारण सभा : सभासदांना दरवर्षीप्रमाणे १५ लाभांश देणार
रत्नागिरी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एकूण व्यवसाय प्रथमच ५ हजार कोटींवर पोचला असून ९४ कोटी रूपयांचा नफा मिळाला आहे. त्यामुळे बँकेने सभासदांना दरवर्षीप्रमाणे १५ लाभांश देणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी बँकेच्या सर्वसाधारण सभेत जाहीर केले. शहरातील जयेश मंगल पार्क येथे आयोजित सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष बाबाजी जाधव, जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.

यावेळी डॉ. चोरगे यांनी उपस्थित सभासदांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, बँकेशी सलग्न असलेल्या विविध सहकारी पतसंस्थांचा कारभार सुरळीत रहावा यासाठी त्यांना केलेल्या पतपुरवठ्यावरील व्याज अर्धा टक्केने कमी घेण्यात येत आहे. त्यामुळे पतसंस्थांचा कर्जव्यवहार वाढेल आणि वसुलीही करता येईल.

जिल्ह्यात बँकेच्या ७४ शाखा असून त्यातील २५ शाखा स्वतःच्या मालकीच्या इमारतीत आहेत. सर्वच्या सर्व शाखा स्वःमालकीच्या इमारतीत सुरू करण्याचे लक्ष्य आहे. कोरोनामुळे मृत पावलेल्या सभासदांचे नातेवाईक, गंभीर आजाराने मृत पावलेले, अपघातात दगावलेल्यांचे कर्ज माफ केले आहे. त्यासाठी बँक दरवर्षी विशेष तरतूद करते. तसेच आतापर्यंत बँकेने १०० संगणक शाळांना भेट दिले आहेत. आपत्तकालीन परिस्थितीत घरे वाहून गेली, मुलांचे अनाथ आश्रम, दिव्यांग मुलांचे वसतीगृह, साहित्य संमेलन, शेतकरी कार्यशाळा अशांसाठी सामाजिक बांधिकलकी म्हणून सुमारे ५५ लाख ८५ हजार रूपये आर्थिक मदत दिली आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निसर्ग चक्रिवादळामुळे व महापुरामुळे नुकसान झालेले शेतकरी, छोटेमोठे उद्योजक व शैक्षणिक संस्था यांनी २५ लाखापर्यंत ५ टक्के व्याजाने कर्जपुरवठा करण्यात आला आहे.

बँकेने ग्राहकांसाठी ३ मोबाईल एटीएम व्हॅन कार्यरत आहेत. या व्हॅन नऊ तालुक्यात कार्यरत असून त्याचा लाभ शेतकरी, ग्राहक व नागरिकांना होत आहे. तसेच ग्राहकांसाठी डिजिटल बँकिंग सेवा उपलब्ध करुन दिली आहे. बँकेने आर्थिक समावेशीकरण योजनेंतर्गत सर्व ९ तालुक्यांच्या ठिकाणी आर्थिक साक्षरता केंद्र कार्यरत केली आहेत. प्राथमिक शेती सहकारी संस्थांचे कर्जव्यवहारात, ठेवीत तसेच कर्जवसुलीत समाधानकारक प्रगती साध्य करण्यासाठी व शेती सहकारी संस्थांचे निकष ठरवून दरमहा संस्थेने केलेला कर्जव्यवहार विचारात घेऊन १५०० ते ५ हजार रूपये आर्थिक मदत दिली जाते.

तसेच जिल्ह्यातील प्राथमिक शेती सहकारी संस्थांना ५ लाख कमाल मर्यादेपर्यंत संस्था कार्यालय इमारत बांधकामाकरिका आर्थिक मदत देण्यात येते, असे डॉ. चोरगे यांनी सांगितले.दरम्यान, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण हे पुढील महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत. त्याबद्दल श्री. चव्हाण यांचा अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष बाबाजी जाधव, जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे, राजाभाऊ लिमये, दीपक राऊत, सुधाकर सावंत आणि विद्यमान संचालकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.