
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५ अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २६ ऑगस्ट जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग नोंदवावा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत.
रत्नागिरी, दि.23 : महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2025 साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 26 ऑगस्ट आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. उदय सामंत व जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय दूरध्वनी क्रमांक 02352-222962 येथे संपर्क साधावा.
जिल्ह्यातील इच्छुक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई मेलवर ऑनलाईन अर्ज करावेत.
सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन, संस्कृतीचे जतन व संवर्धन याकरिता राबविण्यात आलेले उपक्रम, गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय व राज्य स्मारके, धार्मिक स्थळे यांविषयी जनजागरुकता तसेच जतन व संवर्धन, विविध सामाजिक उपक्रम व कार्ये, पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट, ध्वनिप्रदूषण रहित वातावरण, पारंपारिक/देशी खेळांच्या स्पर्धा, गणेश भक्तांसाठी केलेल्या प्राथथ्मक सुविधा यांच्या आधारे केलेल्या कार्याचा गौरव व्हावा आणि असेच समाजाभिमुख उपक्रम अधिकाधिक घडावेत म्हणून प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. याच निकषांच्या आधारे स्पर्धेचे परीक्षण केले जाईल. जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धेत सहभागी होता येईल. जिल्हाधिकारी कार्यालयांनी गठीत केलेली जिल्हास्तरीय समिती ऑनलाईन अर्जाद्वारे या स्पर्धेत सहभागी मंडळांना गणेशोत्सव काळात भेट देतील. समितीला मंडळांनी आपल्या कार्यक्रमाचे फोटो, अहवाल, व्हिडीओग्राफी भेटीवेळी सादर करावे. मंडळांनी केलेल्या कार्याचा कालावधी सन 2024 च्या अनंत चतुर्दशी ते सन 2025 च्या गणेश चतुर्थी पर्यंतचा असेल.
राज्यस्तरीय परीक्षणात प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ५ लाख, २.५ लाख आणि १ लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय विजेत्याला २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.