
ठाकरे गटाच्या या नेत्याने व्यक्त केला निवडणुक आयोगावर संताप! म्हणाले, आयोगाकडून फसवाफसवी सुरूच!!
*ठाणे :* ठाकरे गटाचे विधानसभा उमेदवार राजन विचारे आणि केदार दिघे यांच्या मागणीनुसार ईव्हीएम यंत्र तपासणी आणि पडताळणी नुकतीच करण्यात आली. यासंदर्भात ठाणे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या वृत्तामध्ये ही प्रक्रीया समाधानकारक पार पाडल्याचे म्हटले असून यावरून आता ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी संताप व्यक्त केला आहे. प्रसिद्धीस दिलेल्या वृत्तामध्ये करण्यात आलेला दावा पुर्णपणे खोटा असल्याचे सांगत त्यांनी निवडणुक आयोगाकडून फसवाफसवी सुरू असल्याचा आरोप केला आहे.
ठाणे विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजन विचारे आणि कोपरी-पाचपखाडी मतदार संघातील उमेदवार केदार दिघे यांनी केलेल्या मागणीनुसार केंद्र क्रमांक अनुक्रमे ३०५ आणि ६८ मधील ईव्हीएम व्हीव्हीपॅटच्या बर्न मेमरी, मायक्रोकंट्रोलरची तपासणी आणि पडताळणी करण्यात आली. ही प्रक्रिया १९ जुलै रोजी नवी मुंबईतील तुर्भे भागातील केंद्रीय वखार महामंडळ येथे करण्यात आली. या तपासणीसाठी डायग्नोस्टिक तपासणी आणि मॉक पोल असे दोन पर्याय होते. त्यापैकी डायग्नोस्टिक तपासणीचा पर्याय दोन्ही उमेदवारांनी निवडला होता. ही तपासणी प्रक्रिया अर्जदार उमेदवार, प्रतिनिधी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली. यात दोन्ही केंद्रावरील ईव्हीएम व्हीव्हीपॅट यंत्रे डायग्नोस्टिक तपासणीत योग्य असल्याचे आढळून आले, असा दावा निवडणुक विभागाने केला. तसेच उपस्थित अर्जदार उमेदवार, प्रतिनिधी यांच्या शंकाचे निरसन भारत ईलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या नियुक्त अभियंत्यांनी केले असून ही प्रक्रिया समाधानकारकरित्या पूर्ण झाल्याचा दावा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केला होता. मात्र, हा दावा पुर्णपणे खोटा असल्याचे सांगत राजन विचारे यांनी निवडणुक आयोगावर संताप व्यक्त केला आहे.
*निवडणूक आयोगाने नव्याने बनवण्यात कार्यपद्धतीनुसार ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनच्या बर्न मेमरी, मायक्रोकंट्रोलरची तपासणी आणि पडताळणी तांत्रिक प्रक्रिया समजली नसल्यामुळे ती कार्यपद्धती कशी असेल याचे सादरीकरण माहिती उमेदवार प्रतिनिधींना दिले नव्हते. तसेच दोन दिवसापूर्वी कार्यपद्धतीची लेखी माहिती द्यावी अशी पत्राद्वारे मागणी ही करण्यात आली होती. परंतु ही माहिती अखेर पर्यंत दिली नाही. या प्रक्रियेसाठी उपस्थित न राहिल्यास मॉक पोल घेऊन यंत्रा मधील डेटा डिलीट करण्याची प्रक्रिया कार्यपद्धतीमध्ये करण्यात आली होती. यामुळे तपासणी आणि पडताळणी प्रक्रियेच्या दिवशी सकाळी उपस्थित राहून मतदान केंद्रावरील ईव्हीएम मधील डेटा डिलीट होऊ नये या भीतीने अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार डायग्नोस्टिक तपासणी हा पर्याय निवडून अर्ज भरून दिला. या प्रक्रियेमध्ये कोणाला किती मतदान झाले हे न दाखवता एकूण मतदान दाखवून मशीन बंद केल्या तसेच या प्रक्रिया पार पडत असताना ठाणे विधानसभा मतदान केंद्र क्रमांक ६८ वरील व्हीव्हीपॅट यंत्रामध्ये बॅटरी मिळाली, असा दावा राजन विचारे यांनी केला आहे.
ईव्हीएम मशीन या सिम्बॉल लोडिंग, मतदानाच्या दिवशी मॉक पोल आणि मतदानाला सुरुवात करताना अशी तीन वेळा सुरू असावी लागते. परंतु ही मशीन चार वेळा सुरू झाल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी उमेदवार प्रतिनिधींनी आक्षेप घेतल्यानंतर फिजिबिलिटी रिपोर्ट मध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून नमूद करण्यास भाग पाडले. त्यानंतर ही ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये का ? मतदान केंद्रावर चौथ्यावेळी सुरू करण्यात आली होती, याची सीसी फुटेज आणि कागदपत्रे देण्याची मागणी शिवसेना नेते राजन विचारे यांनी ठाणे जिल्हा निवडणूक विभागाकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.