
देवस्थानच्या वादातून दोन गटात ‘अरेला कारे’; जीवावर बेतले बंदुकीचे छरे
राजापूर-केळवडे हत्या प्रकरण : संशयिताला ठोकल्या बेड्या, पोलिस कोठडीत रवानगी
राजापूर : तालुक्यातील केळवडे गावात गेले काही महिने देवस्थानाच्या वादातून दोन गटात धुसफूस आहे. या वादातून केळवडे येथे बंदुकीने गोळ्या घालून ठार मारल्याचा प्रकार घडला असावा, या उद्देशाने पोलिसांनी तपास केला आणि काही तासांतच पोलिसांनी यातील एका संशयिताला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यात गुन्हेगाराने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
राजापूर तालुक्यातील केळवडे येथे बंदुकीची गोळी लागून मृत्यू झालेल्या दीपक उर्फ बाबू राजाराम गुरव (वय ४५) याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास लावण्यात राजापूर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी केळवडे गावातील संजय उर्फ बंड्या महादेव मुगे याला अटक केली असून संशयित आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती राजापूर पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी बुधवारी पत्रकारांना दिली. त्याला बुधवारी सायंकाळी राजापूर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचेही परबकर यांनी सांगितले. तालुक्यातील केळवडे गावाच्या जवळील जंगलामध्ये दीपक उर्फ बाबू राजाराम गुरव हा शुक्रवार दि. ४ फेब्रुवारी रोजी गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. दीपक याला प्रारंभी उपचाराकरिता सिंधुदुर्ग येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीत दीपक यांच्या डोक्यात बंदुकीचे छरे असण्याची शक्यता वर्तविली होती. त्यावेळी सदर प्रकरणाबाबतची माहिती सिंधुदुर्ग पोलिसांनी राजापूर पोलिसांना दिली होती. राजापूर पोलिसांनी घातपाताची शक्यता लक्षात घेऊन तत्काळ याबाबत दीपक याला गंभीर जखमी अवस्थेत पाहणाऱ्या एका महिलेच्या फियादीवरून अज्ञात इसमाविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर गंभीर जखमी दीपक यांना अधिक उपचारासाठी सिंधुदुर्ग येथून रत्नागिरी येथे उपचारार्थ नेत असताना त्यांचा रत्नागिरी येथील रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता.
या प्रकरणी पोलिसांनी केळवडे गावातील देवस्थानावरून वाद सुरू असलेल्या दोन्ही गटांतील अनेकांना चौकशीसाठी बोलवून चौकशी सुरू केली होती. तर या घटनेनंतर पोलिसांनी कोदवली, केळवडे, शिळ या ठिकाणी छापे टाकून विनापरवाना बंदुकाही जप्त करून काहींना अटक केली होती. याच दरम्यान पोलिसांना संशयित आरोपीपर्यंत पोहचण्यात यश आल्याचे परबकर यांनी सांगितले.
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहीतकुमार गर्ग, उपविभागिय पोलिस अधिकारी श्रीनिवास साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्याकडे सोपवून सदर गुन्ह्याच्या तपासकामी जिल्ह्यातील इतर अधिकारी व अंमलदार यांची पाच तपास पथके तयार केली होती. राजापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मधुकर मौळे , नाटेचे सहायक पोलिस निरीक्षक आबासाहेब पाटील, रत्नागिरी ग्रामीणचे सहायक पोलिस निरीक्षक दिनकर सूर्य , रत्नागिरी सायबर सेलचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण स्वानी, मनोज भोसले, विनायक नरवणे इत्यादी अधिकारी व कर्मचारी यांनी या तपास कामी महत्वाची भूमिका बजवली आहे.