
केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचवण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन
रत्नागिरी, दि. 23 : केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील तळगाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावा या उद्देशाने भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभाग (डीएफएस) च्या निर्देशानुसार जिल्ह्यात 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
* या शिबिरांमध्ये केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना जसे की, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY), आणि अटल पेन्शन योजना (APY) अंतर्गत नागरिकांची नोंदणी केली जाणार आहे. याशिवाय, प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत नवीन बँक खाती उघडणे आणि ज्या लाभार्थ्यांची बँक खाती आहेत त्यांची RE-KYC करण्याची सुविधा देखील या शिबिरांमध्ये उपलब्ध असेल. या उपक्रमाचा जिल्ह्यातील एकही नागरिक केंद्र सरकारच्या या जनहितार्थ योजनांपासून वंचित राहू नये हा मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा आणि या योजनांचा फायदा करून घ्यावा, असे आवाहन अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे यांनी केले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी नागरिकांनी आपल्या संबंधित ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा.