
आजीची भाजी रानभाजी गोखरु व शतावरी
‘आजी आणि तिची रानभाजी’ ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि मानवी आरोग्य समृध्द करणारी तिची रानभाजी या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे. अशा रानभाज्यांची ओळख करुन देणारी ‘आजीची भाजी रानभाजी’ ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सुरु केलेल्या या मालिकेत आजच्या भाज्या आहेत, गोखरु व शतावरी..

गोखरु या वनस्पतीला सराटा, काटे गोखरु, लहान गोखरु, गोक्षुर अशी स्थानिक नावे आहेत. उष्ण, कोरड्या कमी पावसाच्या प्रदेशात ही जमिनीवर वाढणारी रोपवर्गीय वनस्पती आहे. गोखरु हे तण असले तरी ती महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. गोखरु स्नेहन, वेदनास्थापन, मूत्रजनन, संग्राहक व बल्य आहेत. शीतल असून मूत्रपिंडास उत्तेजक आहेत. गोखरुची फळे मुत्राच्या विकारांवर, लैंगिक आजारपणात अत्यंत उपयोगी आहेत.
भाजीसाठी गोखरुची पाने व कोवळी खोडे वापरतात. वारंवार मूतखडा होण्याची प्रवृत्ती थांबते. भाजी स्वच्छ धुवून चिरुन घ्यावी. कढईत तेल घेवून त्यात जिरे, मोहरी, हिंग यांची फोडणी करुन त्यात भिजवलेली तूरडाळ व कांदा परतून घ्यावा. तिखट मीठ घालावे. नंतर थोडे पाणी घालून शिजवून घ्यावे.
*शतावरी*
शतावरी ही फार पूर्वीपासून स्त्री च्या शरीरात पुनःउत्पादनासाठी औषधी वनस्पती म्हणून वापरली जाते. शतावरी शतमुली, शकाकूल या नावानेही ओळखली जाते. शतावरीची अगदी लहान वेल असते. शतावरीच्या कंदामध्ये स्त्रियांसाठी अनेक औषधी घटक असतात. आयुर्वेदामध्ये शतावरीला स्त्रियांसाठी शक्तीवर्धक औषध मानले आहे. मासिक पाळी येण्याअगोदरचा आणि मोनेापॉज नंतरचा त्रास कमी करण्यास शतावरी मदत करते. स्तनपानात मातांचे दूध वाढविण्यासाठी शतावरी उपयुक्त आहे. शतावरी पाचक अँटीयुक्लिअर, अँटीऑक्सीडंट व अँटीकँसर घटक म्हणूनही काम करते. शतावरी यकृताचे संरक्षण करु शकते, हे अभ्यासानुसार सिध्द झाले आहे.
हृदयाचे आणि मूत्रपिंडाचे विकार असणाऱ्या लोकांचा अपवाद वगळता शतावरी सर्वांसाठी सुरक्षित मानली जाते. तरीही वैद्यकीय सल्ल्यानुसारच याचा वापर करावा.
*-प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते* *जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी*