
सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यातील झोळंबेत आढळला उडणारा दुर्मिळ बेडूक.
सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे येथे दुर्मिळ असलेला उडणारा बेडूक आढळून आला आहे. याला मलबार ग्लायडिंग फ्रॉग असे म्हणतात. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास बागायतदारच्या परिसरात ओंकार गावडे, विकास कुलकर्णी आणि सुजय गावडे यांना हा बेडूक आढळून आला. मागील आठवड्यात या परिसरात बॉम्बे सिसिलियन (देव गांडूळ) आढळला होता. त्यामुळे या परिसरातील जैव विविधतेत भर पडली आहे.महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात सापडणारा हा अनोखा बडूक आहे. हा बेडूक उभयचर असून वर्षातील जवळपास ८ महिने निद्रावस्थेत घालवतो. मात्र मान्सून सुरू झाल्यानंतर या बेडकाच्या प्रजाती जागृत होतात. मान्सून बेडकांच्या प्रजननासाठी फार महत्वाचा आहे. पश्चिम घाटाच्या जंगलामध्ये केरळापासून चांदोलीपर्यंत हा सुंदर बेडूक आढळून येतो. टपोरे डोळे आणि सुंदर हिरवा रंग हा त्याचा वेगळेपणा आहे. हा बेडूक एका फांदीवरून दुसर्या फांदीवर उडी मारून तरंगत जातो. त्यासाठी निसर्गाने त्याच्या पायाच्या बोटांना पातळ पडद्याने जोडलेले असते. हा बेडूक निशाचर असल्याने दिवसा झोपतो व रात्री क्रियाशिल होतो.www.konkantoday.com