
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहाद्दूरशेखनाका ते कापसाळपर्यंत उड्डाणपूल न झाल्यास जनआंदोलन.
चिपळूण शहरामधून जाणार्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुल बहाद्दूरशेखनाका ते कापसाळपर्यंत न झाल्यास जनआंदोलन करण्याचा निर्णय शनिवारी येथे झालेल्या महायुतीच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत लढा देण्यासाठी शिष्टमंडळ स्थापन करण्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते विकास मंत्री, नितीन गडकरी यांच्यापर्यंत पोहचण्याचा निर्णय घेण्यात आला.या बैठकीत शहरात होणारा उड्डाणपूल चुकीचा असून तो प्रांत कार्यालयापासून उतरता झाला आहे. उड्डाणपूल भिंत स्वरूपात असल्याने शहराचे विभाजन होणार आहे. तसेच प्रांत कार्यालयाच्या मागील बाजूला असणार्या डोंगरातून येणारे पाणी जाणार कोठे, असा प्रश्न असून त्याचा मोठा फटका बसणार आहे. यामुळे कार्यालये, रूग्णालये, शाळा, लोकवस्ती बाधित होणार आहे. तसेच चुकीची सर्कल, जोडरस्ते यामुळे पॉवरहाऊस, पागनाका ही ठिकाणे अपघाती क्षेत्र ठरत आहेत. त्यामुळे हा उड्डाणपूल कापसाळपर्यंत झाला पाहिजे, अशी भूमिका सर्वांनी मांडली.उड्डाणपुलाचा प्रश्न महायुतीचे आमदार शेखर निकम यांनी राज्य सरकार, मंत्री गडकरी यांच्यापर्यंत नेला असून अधिवेशनातही प्रश्न मांडले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे शहरप्रमुख उमेश सकपाळ, भाजपचे शहराध्यक्ष शशिकांत मोदी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी, माजी नगरसेवक विजय चितळे, किशोर रेडीज, आरपीआयचे मंगेश जाधव, महायुती समन्वयक उदय ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळ स्थापन करून आमदार शेखर निकम, पालकमंत्री उदय सामंत, खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे उर्वरित उड्डाणपूल मंजुरीसाठी पाठपुरवा करण्याचे ठरवण्यात आले आहे.www.konkantoday.com