
पु. ल. देशपांडे यांच्या स्मृतिवर्षानिमित्त ‘आनंदयात्री पुलं’ विशेष कार्यक्रम!
*चिपळूण :* “माणूस वाचता वाचता समजतो आणि माणूस हसता हसता शिकतो” हे पु. ल. देशपांडे यांचे विचार आजही प्रत्येक मराठी मनाच्या गाभाऱ्यात जपले जातात. अशा या बहुरंगी, बहुढंगी, बहुगुणी व्यक्तिमत्त्वाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूणच्या वतीने एक अनोखा सांस्कृतिक कार्यक्रम ‘आनंदयात्री पुलं’ सादर करण्यात येणार आहे.हा कार्यक्रम बुधवार दिनांक ६ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ९.३० वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे रंगणार आहे. यंदाचे वर्ष हे पु. ल. देशपांडे यांचे २५ वे स्मृतिवर्ष आहे. त्या निमित्ताने त्यांचा साहित्यिक, नाट्य आणि संगीत क्षेत्रातील अमूल्य ठेवा चिपळूणमधील रसिक प्रेक्षकांसमोर नव्याने साकारला जाणार आहे.कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पुलंच्या साहित्यातून, नाटकांमधून, गीतांमधून निवडक अंश स्थानिक कलाकारांच्या अभिनय, वाचन, गायन आणि नृत्य सादरीकरणांतून प्रकट होणार आहेत. ‘अंतू बरवा’, ‘नारायण’, ‘वाऱ्यावरची वरात’मधील साक्ष, ‘ती फुलराणी’, ‘तुझे आहे तुजपाशी’ यातील संस्मरणीय प्रसंग, ‘नाच रे मोरा’ या गीतावरील नृत्य अशा विविध कला परंपरा एकत्रित अनुभवायला मिळणार आहेत.पुलं आणि सुनीताबाईंनी जपलेले सहजीवनही एका हृदयस्पर्शी मनोगतातून सादर होणार आहे.
विशेष म्हणजे या कार्यक्रमात चिपळूणमधील जुने आणि नवे अशा ३० हून अधिक कलाकारांचा सहभाग आहे. व्याख्याते मंदार ओक यांच्या संकल्पनेतून साकारत असलेला हा कार्यक्रम कांता कानिटकर यांच्या दिग्दर्शनाखाली रंगणार आहे. निवेदनाची बाजू प्रकाश गांधी, सोनाली खर्चे सांभाळतील.हा कार्यक्रम म्हणजे केवळ एक सादरीकरण नव्हे, तर पुलंना स्थानिक कलाकारांकडून वाहिलेली एक रसिक आदरांजली ठरणार आहे. कार्यक्रमासाठी केवळ रु. २०० आणि १०० असा नाममात्र तिकिट दर ठेवण्यात आला आहे.तिकिटे व अधिक माहितीसाठी नाट्य संयोजक व नाट्य परिषदेचे सदस्य योगेश कुष्टे – ९४२३२ ९३९५१ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नाट्य परिषद शाखा चिपळूण यांच्या वतीने करण्यात आले आहे.साहित्य, संगीत आणि विनोदाचे गारुड अनुभवण्यासाठी ‘आनंदयात्री पुलं’ हा सांस्कृतिक सोहळा चुकवू नका, असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी केले आहे.