
पुण्यातील ‘या’ धरणातील पाण्याचा रंग अचानक बदलला! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण!!
पुणे:* भोर तालुक्यातील भाटघर धरणातील पाण्याला अचानक हिरवा रंग आल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता आणि भीतीचं वातावरण पसरलं आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून धरणाच्या पाण्याचा रंग बदलल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या वेळी धरणाच्या पाण्यावर हिरवट तवंग तयार होतो आणि तो दुपारपर्यंत टिकतो. अचानक धरणाच्या पाण्याला हिरवा रंग आल्याने स्थानिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यात या धरणातून अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.
धरणाच्या उत्तरेकडील बाजूस तसेच संगमनेर, माळवाडी आणि नऱ्हे गावांच्या किनाऱ्यावर पाण्याचा रंग बदलल्याचे निदर्शनास आले आहे. या जलाशयातून भोर शहरासह परिसरातील अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.स्थानिक नागरिकांच्या मते, धरणात मत्स्यपालनासाठी काही खासगी व्यावसायिकांना परवानगी देण्यात आली आहे. हे व्यावसायिक माश्यांना खाद्य टाकत असून, त्यामुळेच पाण्याला हिरवा रंग येत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेची गंभीर दखल घेत उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पाण्यातील तवंग हटवण्यासाठी आवश्यक उपाय तातडीने राबवण्याच्या सूचनाही संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत.




