
शिर्केच्या विद्यार्थी – शिक्षकांसह पालकांनी घेतली अमली पदार्थ मुक्तीची शपथ एनसीसी ,स्काऊट गाईड विभागासह प्रहारी गटाकडून आयोजन.
रत्नागिरी : शहरातील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची रा.भा. शिर्के प्रशाला , रत्नागिरी येथे ‘अमली पदार्थांचे दुष्परिणाम ‘या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल व विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. दि. १९ जुलै रोजी जिल्हा माध्यमिक , प्राथमिक शिक्षण विभाग व राज्यशासन यांच्या मार्गदर्शनानुसार प्रशालेच्या रंजन मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना व पालकांना अमली पदार्थ म्हणजे काय ? तसेच अमली पदार्थाचे दुष्परिणाम आरोग्यावर आणि समाजावर कशा पद्धतीने होत आहेत ? या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले . यावेळी प्रशालेचे स्काऊट – गाईड विभाग व प्रहारीगट प्रमुख प्रशांत जाधव यांनी अमली पदार्थांचे दुष्परिणाम विद्यार्थी व पालकांना दृकश्राव्य माध्यमातून पटवून दिले. तसेच उपस्थित सर्व विद्यार्थी व पालकांना अमली पदार्थ मुक्त शपथ देण्यात आली.आपल्या शाळेच्या शिस्तीसह अभ्यासमय वातावरणाला ७५ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. आपले विद्यार्थी देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत.
आपल्या ५ विद्यार्थीनींना मानाचा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त झाला असून विविध महत्वाच्या ठिकाणी आपले विद्यार्थी कार्यरत आहेत याचे श्रेय रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीसह विद्यार्थी , पालक व आजी – माजी शिक्षकांना असल्याचे मुख्याध्यापक श्री.के.डी. कांबळे यांनी नमूद केले . यापुढे सुद्धा ही उज्ज्वल परंपरा कायम टिकविण्याची जबाबदारी आपली सर्वांची असून अमली पदार्थसारखे समाजआरोग्य विघातक पदार्थ आपण हद्दपार करू त्यासाठी प्रशासनाला सहकार्य करूया असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. ए.पी. चव्हाण यांनी तर अभारप्रदर्शन श्री. एम. व्ही. जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापक सौ. पी.एम. पवार , पर्यवेक्षक सौ. पी.एस. काजरेकर यांसह बहुसंख्येने विद्यार्थी ,पालक उपस्थित होते.