
वसंत विष्णू तथा राजाभाऊ लिमये यांचा २१ जुलै रोजी वाढदिवस आहे. ते ९० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. याबद्दल राजाभाऊंचे मनोगत..
जन्म २१ जुलै १९३६ रोजी झाला आणि शिक्षण ज्युनिअर बी.ए. पर्यंत झाले. १९५६ -१९५७ मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी कॉंग्रेसच्या सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मोठी चळवळ सुरू केल्याने काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते या चळवळीत सहभागी झाले.

त्यामुळे काँग्रेस कार्यालयात बसण्यास मला कै. सावंत, शामराव पेजे तसेच माझे वडील बाळासाहेब लिमये यांनी आग्रहाने तेथे पाठवले. तेव्हापासून मी काँग्रेसच्या कार्यात सहभागी झालो. महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर १९६०-१९६२ शहर काँग्रेस सचिव तदनंतर सात ते आठ वर्षे तालुका काँग्रेसचा सचिव, १९८२-१९९२ जूनपर्यंत जिल्हा काँग्रेसचा सचिव म्हणून कार्यरत होतो.१९९२ च्या मार्च महिन्यात जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर पाच वर्षाच्या कारकिर्दीत जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात ग्रामीण जनतेचे विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिकस्तीचे प्रयत्न प्रामाणिकपणे केले. या पाच वर्षांत विरोधी पक्षच काय तर प्रशासनाच्या कार्यालयातील कुठल्याही संघटनेकडून केव्हाही एखाद्या आंदोलनाची नोटीस कोणीही दिलेली नाही.

प्रशासनातील सर्वांना शक्य तेवढे आपापले कार्य वेळच्या वेळी करण्यास प्रवृत्त केले. पहिलीपासून इंग्रजी विषय शिकवण्यास प्रारंभ केला. तसेच दरवर्षी कर्मचाऱ्यांचे दोन-तीन दिवसांचे स्नेह-संमेलन सुरू केले. त्यासाठी जिल्हा परिषद फंडातून निधी देण्याचा निर्णय घेतला. या स्नेहसंमेलनात फक्त कर्मचाऱ्यांनीच भाग घ्यावा, ,म्हणून प्रवृत्त केले. बाहेरील कोणालाही संधी देता कामा नये अशी अट घातली. या पाच वर्षाच्या काळामध्ये जिल्हा परिषदेचे जे निर्णय झाले ते एकमुखी झालेले आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेचा कारभार एकदिलाने चालला हे इथे अभिमानाने सांगावेसे वाटते. १९९५-१९९७ या काळात महाराष्ट्रातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या संघटनेचा अध्यक्ष म्हणूनही मला कार्य करण्याची संधी शरद पवार साहेब यांनी दिली.

त्यामुळे महाराष्ट्रातील आठ ते दहा जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निमंत्रणावरून तिथेही जाऊन कार्य करण्याची संधी लाभली.महाराष्ट्रात १९६२ पासून पंचायत राज सुरु झाले तेव्हापासून जिल्हा परिषद व पंचायत समिती या संस्थांचा कार्यभार कसा चालतो याचा भरपूर अनुभव असल्याने रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर उत्तम कार्य करून दाखवण्याची संधी मला मिळाली. रत्नागिरी रोटरी क्लब, रिमांड होम, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा महिला पतसंस्था, रत्नागिरी जिल्हा ऑटो-रिक्षा चालक-मालक संघटना अशा अनेक संस्थांचा अध्यक्ष व संस्थापक सदस्य म्हणूनही अनेक वर्षे कार्यरत होतो. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा कोकण विभागीय अध्यक्ष म्हणून नऊ वर्षे कार्यरत होतो. दापोलीच्या आर. व्ही. बेलोसे शिक्षण संस्थेचा अध्यक्ष म्हणूनही चार ते पाच वर्षे कार्यरत होतो. ऑक्टोबर २००४ ते २०१६ पर्यंत केंद्रीय नारळ बोर्डाचा सदस्य व दोन टर्म उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत होतो. याशिवाय चव्हाण प्रतिष्टानचा विभागीय अध्यक्ष म्हणून काम करीत असता खेड, सातारा जिल्ह्यास जोडणारा रघुवीर घाट हा मार्ग बांधकाम खात्याचे मंत्री अधिकारी यांना भेटून सुरू करण्याचे प्रयत्न केले. लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्य ग्रंथाच्या शताब्दीचा कार्यक्रम करावा, म्हणून देवरूखचे प्राचार्य सुरेश जोशी यांनी आग्रह केला आणि त्यांच्या विचाराने हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात रत्नागिरीतच झाला.

या कार्यक्रमामुळे सर्वत्र आमच्या विभागीय कार्याची स्तुतीही झाली.बाळशास्त्री जांभेकर ट्रस्टतर्फे दरवर्षी दर्पणचा वाढदिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्या पालखीत बाळशास्त्री जांभेकर यांची मूर्ती त्याचप्रमाणे दर्पण वृतपत्राची तसबीर ठेवली जावी, अशी मंडळाच्या अध्यक्षांना विनंती केली. त्यानुसार दर्पणचे पहिल्या अंकाचे छायाचित्र घेऊन ती तसबीर बनवून पालखीत ठेवण्याची कामगिरीही मी पार पाडलेली आहे. १ जून १९६१ पासून सत्यशोधक साप्ताहिकाचा संपादक म्हणून २०१२ पर्यंत कार्य केले.
१ जून १९६१ ते १९७६ पर्यंत पी.टी.आय. संस्थेचा राज्य प्रतिनिधी, इंडियन एक्सप्रेस व लोकसत्ता या दैनिकांचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्य केले. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, तेव्हापासून मी राष्ट्रवादी कॉग्रेसचा कार्यकर्ता म्हणून कार्य केले. या काळात मी अनेक लघु व मोठमोठ्या उद्योजकांनाही चालना देण्याचे काम केले. २०२१-२०२२ पासून मी सामाजिक सेवेतून निवृत्ती घेतली.गोळप, रनपार येथे छाब्रिया यांची फिनोलेक्स इंडस्ट्रीज व जयगड येथे जिंदल कंपनी आणण्यात मोठी कामगिरी केली आहे. निस्वार्थी भावनेने आणि स्थानिकांना रोजगार मिळण्याकरिता उद्योग यावेत, यामुळे कोणाचेही नुकसान होऊ नये, त्यात स्वतःला काही मिळावे अशी अपेक्षाही न करता प्रयत्न केले. यामुळेच आज या दोन कंपन्यांकडून हजारो स्थानिकांना गावातच रोजगार उपलब्ध झाला आहे.