
रत्नागिरी नगरपरिषद संचलित आधार नागरी बेघर निवारा केंद्राचे लोकार्पण संस्कारक्षम जिल्ह्यात ज्येष्ठांवर बेघर होण्याची वेळ येऊ देऊ नका -पालकमंत्री डॉ. उदय सामंत.
रत्नागिरी दि.21 :. या भावनिक कार्यक्रमाला महिलांची मोठी उपस्थिती आहे. रत्नागिरी जिल्हा हा संस्कारक्षम जिल्हा आहे. अशी बेघर निवारा केंद्रे उभी राहूच नयेत, यासाठी तुम्ही ब्रॅण्ड ॲम्बेसिडर बनून मुलांना जावून सांगण्याचा तसा प्रयत्न करा. ज्येष्ठांना मान सन्मान देण्यासाठी आपुलकीने विचारपूस करण्यासाठी या. बेघर निवारा केंद्राचे स्नेहमंदिर नामकरण करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.
केंद्र व राज्य शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान रत्नागिरी नगरपरिषद संचलित आधार नागरी बेघर निवारा केंद्राचे लोकार्पण आज झाले. या प्रसंगी मुख्याधिकारी वैभव गारवे, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, बिपीन बंदरकर, राजेंद्र शेटे, सुदेश मयेकर, राजेंद्र महाडिक, बाबू म्हाप शीतलताई बावस्कर शिल्पाताई सुर्वे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, बेघरांसाठी निवारा केंद्र असं मी म्हणणार नाही. स्नेहमंदिर म्हणू सगळ्यात चांगलं शासनामार्फत घर देण्याचा जिल्ह्यातील हा उपक्रम महाराष्ट्रामध्ये आहे. आम्ही ज्या गादीवर झोपतो, जी चादर वापरतो, तशीच इथल्या नागरिकांना मिळाली पाहिजे. करमणुकीसाठी स्वतंत्र टीव्ही असला पाहिजे आणि वातानुकुलित घरात राहिले पाहिजेत. त्यासाठी जे काही पैसे लागतील ते दिले जातील. ज्या मुलांना जन्म दिला, ती मुले ‘हे घर तुमच्यासाठी खुले नाही,’ असे आपल्या ज्येष्ठांना सांगतात, हे अत्यंत वाईट आहे. हे मला इथं आल्यानंतर कळलं आणि म्हणून मला असं वाटतं की याचे स्नेहमंदिर असा नामकरण सोहळा देखील झाला पाहिजे.
घरातल्या माणसासारखं तुम्ही जर या लोकांना वागवाल, त्यावेळी त्यांचा शेवट हा आनंदामध्ये असू शकतो. इथं आलेल्या माणसाला वाटलं पाहिजे की माझ्या मुलांने काळजी घेतली नाही, माझ्या मुलीने काळजी घेतली नाही. पण, नगरपालिकेने घेतली आणि त्यांच्यापेक्षा चांगली घेतली. अशा पद्धतीने या घरात सुविधा हव्यात. त्यासाठी, माझ्या वडीलधाऱ्या माणसाला जपण्यासाठी जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे देण्याची माझी प्रवृत्ती आहे. अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही. महिला भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मातृत्व जपतात, त्यांनी अशा केंद्राच्या ब्रॅण्ड अॕम्बेसिडर बनावं. उद्घाटनाला जशी आपण इमारत ठेवलेली आहे, तशीच 365 दिवस ती इमारत राहिली पाहिजे. आपण घरात जेवढी सेवा करणार नाही, त्याच्यापेक्षा दुप्पट सेवा आपल्याला इथे करावी लागणार आहे. महाराष्ट्रात 87 ठिकाणी अशी केंद्रं उभी राहत आहेत. त्या सर्वांचे ‘स्नेहमंदिर’ नामकरण करण्याची मागणी मी करतो.
रत्नागिरीची संस्कृती जपण्याचं काम महिला भगिनींनी करावे. आपल्या परिसरामध्ये अशा गोष्टी जर घडत असतील तर त्याचे आत्मचिंतन सर्वांनीच केले पाहिजे. असा प्रकार घरामध्ये होता कामा नये. स्नेहमंदिरात माझे वडील आहेत. कोणीतरी माझा भाऊ आहे म्हणून चौकशी करायला भगिनींनी जावे. अशा पद्धतीने विचारपूस करायला आपण आलो, तर खऱ्या अर्थाने पुण्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. भविष्यामध्ये असे स्नेहमंदिर उभे राहता कामा नये, याची आपण सगळ्यांनी दक्षता घेतली पाहिजे.
लोकार्पणानंतर पालकमंत्र्यांनी पहाणी करुन येथील ज्येष्ठांशी संवाद साधला. मुख्याधिकारी श्री गारवे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.000