मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी रुग्णांसाठी जीवनदायी

*अचानक उद्भवलेल्या गंभीर आजारांमुळे किंवा अपघातांमुळे कुटुंबाला मोठे वैद्यकीय खर्च करावे लागतात. आर्थिक अडचणींमुळे अनेकांना योग्य उपचार मिळविणे कठीण होते. गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक बळ मिळावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्याला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष सुरू केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते 2 मे 2025 रोजी या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले आहे. हा कक्ष जिल्ह्यातील अनेक गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना खऱ्या अर्थाने ‘जीवनदायी’ ठरत आहे.

मुख्यमंत्री कार्यालयामार्फत अनेक दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाकरिता रुग्णांना आर्थिक सहाय्य देण्यात येते. राज्यातील गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे, हाच या कक्षाचा प्रमुख उद्देश आहे. मुख्यमंत्री सचिवालयाच्या दि. 13 ऑगस्ट 2015 च्या परिपत्रक क्र. मुमंसनि-2015/प्र.क्र.1/निधी कक्ष नुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष कार्यरत आहे. या कक्षाच्या माध्यमातून हजारो रुग्णांना उपचार मिळाले आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या योग्य आणि पारदर्शक वितरणासाठी राज्य आणि जिल्हास्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. निधीचा वापर योग्य गरजूंपर्यंत पोहोचतो की नाही याची खात्री या समितीमार्फत केली जाते. राज्यस्तरीय समिती ही मुख्यमंत्री सहायता निधीच्या व्यवस्थापनाची आणि धोरणात्मक निर्णयांची शिखर संस्था आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अखत्यारित हा कक्ष कार्य करतो.

प्रमुख कार्ये:

निधीच्या वितरणाबाबत धोरणात्मक निर्णय घेणे.* मोठ्या आर्थिक मदतीसाठीच्या अर्जांचे पुनरावलोकन करणे.* राज्यभरातील निधीच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवणे.* नवीन आजार किंवा उपचारांचा निधीसाठी समावेश करण्याबाबत विचार करणे.* राज्यातील सर्व जिल्हास्तरीय कक्षांशी समन्वय साधणे.

राज्यातील गरजू रूग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरविली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यासंदर्भात दि.22 फेब्रुवारी 2025 रोजी शासन निर्णय काढण्यात आला. वैद्यकीय उपचासाठी मदत मिळावी, याकरिता गरजू रूग्ण व त्यांचे नातेवाईक मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज करत असतात. अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी ते मंत्रालयात वारंवार येतात. रूग्ण व नातेवाईकांना होणारा त्रास लक्षात घेवून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून रूग्ण व नातेवाईकांची परवड थांबविण्याच्या उद्देशातून हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमध्ये रुग्णालय अंगीकृत करण्याची प्रक्रिया आणि मुख्यमंत्री वैद्यकीय अर्थसहाय्य वितरीत करणे, या दोन्ही प्रक्रिया संपूर्णतः निःशुल्क आहेत. नागरिकांची सोय लक्षात घेऊन, अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष सुरू करण्यात आले आहेत. यामुळे अर्जदारांना मंत्रालयात जाण्याची गरज राहिलेली नाही. त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो. जिल्हास्तरीय समिती ही स्थानिक पातळीवरच्या गरजा आणि अर्जदारांना तात्काळ मदत देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.

प्रमुख कार्ये:* जिल्ह्यातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठीचे अर्ज स्वीकारणे.* अर्जांची प्राथमिक पडताळणी करणे आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तपासणे.* लहान किंवा कमी गुंतागुंतीच्या वैद्यकीय प्रकरणांमध्ये त्वरित निर्णय घेऊन निधी मंजूर करणे.* आवश्यकतेनुसार, अर्ज राज्यस्तरीय समितीकडे शिफारशीसाठी पाठवणे.* रुग्णालयांशी समन्वय साधणे आणि उपचारांच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे.* स्थानिक गरजू रुग्णांना निधी योजनेची माहिती देणे आणि अर्ज भरण्यास मदत करणे.

मदत कोणत्या आजारांवर मिळते* कॉकलियर इम्प्लांट/अंतस्त कर्ण रोपण शस्त्रक्रिया (Cochlear implant) वय वर्षे २ ते ६, ह्दय प्रत्यारोपण (Heart Transplant), यकृत प्रत्यारोपण (Liver Transplant), मुत्रपिंड प्रत्यारोपण (Kidny Transplant), फुप्फुस प्रत्यारोपण (Lung Transplant ), अस्थीमज्जा प्रत्यारोपण (Bone Marrow Transplant ), हाताचे प्रत्यारोपण (Hand re reconstruction surgery ), खुब्याचे प्रत्यारोपण (Hip replacement), कर्करोग शस्त्रक्रिया (Cancer Sugery), कर्करोग औषधोपचार किरणोपचार (Cancer Chemotherapy and Radiotherapu), अस्थिबंधन (Surgery For ligament injury), नवजात शिशुचे संबधित आजार (Diseases of new born babies), गुडघ्याचे प्रत्यारोपण (knee replacement), रस्ते अपघात (Road Traffic accidents), लहान बालकांच्या संबधित शस्त्रक्रिया (Paediatric Surgeris), मेंदुचे आजार (Diseases of nervous system), हृदयरोग (Cardiac Diseases), डायलिसिस (Dyalysis), जळीत रुग्ण (Burn Injuries ), विद्युत अपघात/विद्युत जळीत रुग्ण (Electric Burn Injuries ).

अर्जासाठी कागदपत्रे :-* विहीत नमुन्यातील अर्ज, रुग्ण दाखल असल्यास त्याचा Geo Tag फोटो, निदान व उपचारासठी लागणाऱ्या वैदयकिय खर्चाचे अंदाज पत्रक (रुग्ण खासगी रुग्णालय दाखल असल्यास सदरहू अंदाजपत्रक मा. जिल्हा शल्य चिकित्सक यांचेद्वारे प्रमाणित करुन घतलेले असावे) तहसिलदार कार्यालयाद्वारे प्रमाणित चालू आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला. (रु.१.६० लाख प्रती वर्ष पेक्षा कमी असणे आवश्यक आहे), रुग्णाचे आधार कार्ड/ लहान बालकांच्या बाबतीत – बालकाच्या मातेचे आधारकार्ड, रुग्णाचे रेशनकार्ड, संबंधित व्याधी विकार/ आजाराचे संबंधी निदानात्मक तथा उपचारात्मक बाबींची कागदपत्रे, अपघातग्रस्त रुग्णांच्या बाबतीत FIR रिपोर्ट, अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अपेक्षित असलेल्या रुग्णांसाठी विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती (ZTCC), अर्थ सहाय्याची मागणी Online पध्दतीने अर्थात ई-मेल द्वारे केलेली असल्यास मुळ अर्जासह सर्व कागदपत्र, एकत्रितरित्या वाचनीय अशा (PDF) स्वरुपात पाठविण्यात यावेत. (E-mail ID) aao.cmrf-mhgov.in) टोल फ्रि नंबर- १८००१२३२२११.000 *-प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते* *जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button