
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील 11 आरोपींची निर्दोष सुटका; 2006 साली 11 मिनिटांत 7 ठिकाणी झालेले स्फोट!
मुंबईत 2006 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाने आज (21 जुलै) महत्त्वाचा निकाल दिला. त्यानुसार मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील (Mumba Blast Case) 11 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती आणि न्यायमूर्ती एस चांडक यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटात 209 जणांचा मृत्यू झाला होता. तर 800 हून अधिकजण जखमी झाले होते. मात्र, उच्च न्यायालयाने याप्रकरणातील सर्व 11 आरोपींना निर्दोष सोडल्याने तपास यंत्रणांना मोठा झटका बसला आहे. दरम्यान, मुंबईतील लोकल ट्रेन्समध्ये 11 मिनिटांत सात ठिकाणी स्फोट झाले होते. चर्चगेट ते बोरिवली स्थानकांदरम्यान हे स्फोट झाले होते. या स्फोटांसाठी कुकर बॉम्बचा वापर करण्यात होता. मात्र, पोलीस आणि तपास यंत्रणांना याप्रकरणात न्यायालयात योग्यप्रकारे पुरावे सादर न करता आल्यामुळे 11 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
पाच जणांना फाशी आणि सात जणांना जन्मठेपेची सुनावलेली शिक्षा-
2015 साली विशेष न्यायालयाने याप्रकरणातील 12 आरोपींना दोषी ठरवत पाच जणांना फाशी आणि सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पोलिसांनी आपल्याला मारहाण करुन जबाब नोंदवले असा आरोप याप्रकरणातील दोषींनी केला होता. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आजच्या सुनावणीला सर्व 12 पैकी 11 आरोपी येरवडा, नाशिक, अमरावती आणि नागपूर कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लावली हजेरी लावली होती. उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर या आरोपींनी आनंद व्यक्त केला.
19 वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन सुनावणीनंतर निकाल-
यापूर्वी कनिष्ठ न्यायालयाने पाच जणांना फाशीची शिक्षा आणि उर्वरित सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने हा निकाल फिरवत 11 आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. 19 वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन सुनावणीनंतर न्यायालयाने हा निकाल दिला. या निकालामुळे मुंबई पोलिसांच्या तपासाला झटका बसला आहे. न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.