
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान मोठा गोंधळ उडाला आहे. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत घुसखोरी करत जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर सुनील तटकरेंवर पत्ते उधळत निषेध नोंदवला.यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. यामुळे संपूर्ण लातूर शहरात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खासदार सुनील तटकरे लातूरमध्ये पत्रकार परिषद घेण्यासाठी आले होते. त्याचवेळी छावा संघटनेचे काही कार्यकर्ते अचानक सभागृहात शिरले. त्यांनी पत्ते उधळून कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा निषेध नोंदवला. त्यामुळे कार्यक्रमात गोंधळ उडाला. माणिकराव कोकाटे हे काही वर्षांपूर्वी शिवसेनेतून राष्ट्रवादीकडे आलेले वरिष्ठ नेते आहेत. त्यांचा नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात ते सभागृहात पत्ते खेळताना दिसत आहे
छावा संघटना ही कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय भूमिकांवर नाराज आहे. त्यामुळे संघटनेने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत सुनील तटकरेंसमोरच निषेध केला आहे. छावा संघटनेच्या घोषणांनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले. दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडले. हाणामारी सुरू झाली. लाथाबुक्यांचा वर्षाव झाला, काही जणांनी खुर्च्याही फेकल्या.यामध्ये राष्ट्रवादीचे स्थानिक नेते सुरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटनेनंतर लातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही गटांना वेगळं केलं. सध्या या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. दोन्ही गटांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर लातुरातील राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेमध्ये आधीपासूनच असलेला वाद आता उघडपणे समोर आला आहे.