
आजीची भाजी रानभाजी मायाळू आणि रानकेळी
‘आजी आणि तिची रानभाजी’ ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि मानवी आरोग्य समृध्द करणारी तिची रानभाजी या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे. अशा रानभाज्यांची ओळख करुन देणारी ‘आजीची भाजी रानभाजी’ ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सुरु केलेल्या या मालिकेत आजच्या भाज्या आहेत, मायाळू अणि रानकेळी..
मायाळू ही बेलबोंडी या नावानेही ही ओळखली जाते. मायाळूची भजी बनवली जातात. मायाळूची पाने स्वच्छ धुवून घ्यावीत. बेसनमध्ये पाणी घालून त्यामध्ये हळद, ओवा, हिंग, मीठ, तिखट घालून मजीसाठी मिश्रण तयार करुन घ्यावे. मायाळूचे पान मिश्रणात बुडवून तेलात सोडावे. मध्यम आचेवर पलटून तळून किंचित लालसर रंग आला की काढावीत. भाजी (भगर किंवा पीठ पेरून) प्रथम कढईत तेल गरम करुन, मोहरी-जिरे, चिरलेला कांदा घालून फोडणी घ्यावी. परतून हळद, हिंग मिरची, गोडा मसाला घालावा. त्यावर मायाळूची स्वच्छ धूवून चिरलेली पाने घालावीत. आता थोडे वेळ पाने शिजवून मग त्यात कोरडेच बेसन भुरभुरावे. चविपुरते मीठ, साखर घालून वाफेवर मंद आचेवर शिजवून घ्या. बेसन शिजले की गॅस बंद करावा.
*जंगली केळी (कवदर)* डोंगराळ आणि दुर्गम भागांमध्ये आपल्याला केळीपेक्षा लहान आकाराची, केळीसारखी दिसणारी झाडे दिसतात. त्यांना रानकेळी म्हणतात. आदिवासी लोक यांना ‘कवदर’ असेही म्हणतात. ही रानकेळी जंगलामध्ये, अडचणीच्या ठिकाणी तसेच खडकांच्या कपारीत, दऱ्यांमध्ये उगवतात. रानकेळी सामान्य केळीप्रमाणेच असतात. त्यांची फळे केळीपेक्षा लहान आणि पिवळ्या रंगाची असतात. या रानकेळीमध्ये काळ्या रंगाच्या बिया असतात. या बिया आपल्या शेतात बांधावर टाकल्यास रानकेळी सहज उगवतात.
रानकेळीच्या फळांमध्ये औषधी गुणधर्म असतात. ताप, खोकला, ब्राँकायटिस, आव (अमाश), संसर्ग, लैंगिक संक्रमित संक्रमण (एसटीआय) आणि काही असंक्रमित रोगांवर त्या उपयुक्त ठरतात. आपली प्रतिकारशक्ती वाढते. गर्भाशयाच्या तक्रारी दूर होतात. मासिक पाळीच्या वेळी होणारा अतिरिक्त रक्तस्राव आणि मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी त्या उपयोगी आहेत. तसेच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासही त्या मदत करतात.
*-प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी*