
होय, सावली बार माझ्या पत्नीच्या नावावर -माजी मंत्री रामदास कदम
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईत डान्सबार असून या डान्सबारवर अलीकडेच पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी या डान्सबारमधील २२ बारबालांवर कारवाई देखील केली आहे”, अशी माहिती देत शिवसेना (ठाकरे) आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.परब यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना सरकारला धारेवर धरलं. दरम्यान, योगेश कदम यांचे वडील व माजी मंत्री रामदास कदम यांनी कबूल केलं आहे की कांदिवलीत पोलिसांनी कारवाई केलेला बार त्यांच्या पत्नीच्या नावाने आहे.
रामदास कदम म्हणाले, “अनिल परब हे अर्धवट वकील आहेत आणि या अर्धवट वकिलाच्या सल्ल्याने उद्धव ठाकरे चालतात, त्यामुळेच त्यांची अशी अवस्था झाली आहे. आमचा तो बार गेल्या ३० वर्षांपासून एक शेट्टी नावाचा इसम चालवतो आहे. हे वास्तव आहे की त्या हॉटेल आणि बारचा परवाना माझ्या पत्नीच्या नावाने आहे. तसेच तिच्या नावाने ऑर्केस्ट्राचा परवाना देखील आहे. मुलींचं वेटरचं लायसन्स देखील आमच्याकडे आहे. परंतु, ते काही अनधिकृत नाही. तिथे अनधिकृतपणे डान्स चालत नाही.”डान्सबार व हॉटेल संदर्भातील कलमात म्हटले की करार करून एखाद्या इसमाला हॉटेल व बार चालवायला दिल्यानंतर तिथे घडणाऱ्या सर्व गोष्टींसाठी तो इसम जबाबदार असेल. मालक जबाबदार नसतो, असा नियम आहे. परंतु त्या अर्धवट वकिलांना या नियमाची माहितीच नाही. अनिल परब केवळ मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, मी देखील आता वकिलांचा सल्ला घेऊन अनिल परब यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा करता येतोय का? याची चाचपणी करत आहे.”