
रविवारपासून राजापुरात रस्त्यावरील मच्छी विक्रीला कडक बंदी न.प.मध्ये आयोजित बैठकीत महिला विक्रेत्यांची सहमती आणि निर्णय
राजापूरः नागरी नियम आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून रस्त्यावर मच्छी विक्रेत्या करणाऱ्या महिलांनी राजापूर नगर परिषदेने लाखो रूपये खर्चुन बांधलेल्या मच्छीमार्केटमध्येच आपला व्यवसाय करावा यासाठी शुक्रवारी या महिला मच्छी विक्रेत्यांची एक बैठक राजापूर नगर परिषदेत झाली. आरोग्य विभागामार्फत नेमण्यात आलेले शहराचे ब्रँड अॅम्बेसेडर तथा स्वच्छतादूत महेश शिवलकर यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत येत्या रविवारी २० जुलैपासून सर्व मच्छी विक्रेते हे केवळ मच्छीमार्केटमध्येच व्यवसाय करतील. रस्त्यावर दुर्गंधी पसरेल असे वर्तन करणार नाहीत यावर एकमत झाले. या बैठकीला सुमारे बारा मच्छीविक्रेत्या भगिनी उपस्थित होत्या.नगर परिषदेच्या पाणीपुरवठा अभियंता तथा आरोग्य विभागाच्या प्रमुख श्रीमती सुप्रिया पोतदार, आरोग्य विभागाचे अमित पोवार, स्वच्छता निरीक्षक सुशील यादव, मुकादम राजा जाधव आदींसह मच्छी विक्रेत्या महिलांसोबत न.प.च्या बॅ. नाथ पै सभागृहात ही महत्वपूर्ण विषयावरील बैठक झाली.
राजापूर नगर परिषदेने लाखो रूपये खर्च करून शहरात मच्छीमार्केटची उभारणी केलेली असताना शहराच्या काही भागात तसेच छत्रपती शिवाजी महाराज पथ याठिकाणी रस्त्यावरील मच्छीविक्रीमुळे मच्छीच्या पाण्याने अनारोग्य पसरते तसेच जे नागरिक अशा खाद्यापासून अलिप्त आहेत त्यांना नाक मुठीत घेऊन वावर करावा लागतो याकडे या बैठकीत मच्छी विक्रेत्या महिलांचे लक्ष वेधण्यात आले. त्यांनीही या बाबींकडे सकारात्मकदृष्टीने पाहत चर्चेत सहभाग घेतला. कारवाईसाठी येणाऱ्या न.प.तील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना काही मच्छीविक्रेत्या अटकाव करताना त्यांच्या असलेल्या वर्तनाबाबतही या बैठकीत चर्चा झाली. स्वच्छतादूत महेश शिवलकर यांनी मच्छीविक्रेत्या महिलांचे प्रबोधन करताना त्यांना राजापूर नगर परिषदेने स्थानिक नागरिकांसाठी आखलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असताना तालुक्यातून अथवा बाहेरगावाहून आलेल्या कोणत्याही व्यावसायिकाला येथे न.प.चे कायदेकानून पाळावे लागतील याची जाणीव करून दिली. त्याचवेळी विक्रेत्यांपैकी सर्वांना समान न्याय असेल याची ग्वाही दिली.या बैठकीत या महिला मच्छी विक्रेत्यांच्या तक्रारी व म्हणणेही ऐकून घेण्यात आले. त्याचवेळी अनेक निर्णय सर्वानुमते घेण्यात आले. या बैठकीत रविवारी २० जुलैपासून सर्वच मच्छी विक्रेत्यांनी मच्छीमार्केटमध्येच मच्छीची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. याउपरही ज्या महिला अथवा विक्रेते रस्त्यावर मच्छी विक्री करताना आढळून येतील त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले. मच्छीमार्केटमध्ये जागांसाठी सीमांकन करण्यात येईल. गाळ्यामध्ये प्रतीदिन चाळीस रूपयांचा कर सर्वांसाठी ठेवण्यात आलेला आहे. मच्छीमार्केटमध्ये दररोज सकाळच्यावेळी पहिल्यांदा मत्स्य विक्रीसाठी येणारी महिला अथवा विक्रेता प्रथम जागा घेतील. शहरात अन्यत्र रस्त्यावर कोठेही मत्स्य विक्री करण्यात येणार नाही. जवाहर चौक येथील पिकअपशेडमध्ये मासे विक्रीकरीता असलेली भांडी ठेवू नये याबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला. शिवाय मच्छीमार्केटमधील मत्स्य विक्री करणाऱ्या महिलांना नियमांबाबत विक्रेते तसेच न.प.चा संबंधित विभाग यांनी माहीती द्यावी असे यावेळी ठरवण्यात आले.राजापूर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या दृष्टीकोनातून शुक्रवारी झालेल्या बैठकीचे नागरिकांनी देखील स्वागत केले असून भविष्यात आणखीही काही उपाययोजनांच्या बाबतीत पावले उचलली जाणार असल्याचे सांगण्यात आले.