
चिपळूण नगरपालिकेने हाती घेतलेले विकास प्रकल्प वेगवेगळ्या कारणामुळे अर्ध्यावरच लटकले.
चिपळूण नगरपालिकेने हाती घेतलेले प्रकल्प कधी राजकारण, कधी मूल्यांकन तर कधी तांत्रिक अडचणींमुळे अर्ध्यावरच अडकले आहेत. महर्षी कर्वे भाजीमंडई, मटणमार्केट, महिला क्रीडासंकूल, पवन तलाव क्रीडांगणासारख्या प्रकल्पांना प्रशासकीय कारभारात पूर्ण होण्याची अपेक्षाही आता मावळली आहे.येथील पालिकेने २००५च्या पूरपरिस्थितीनंतर शहरातील काही प्रकल्पांना नव्याने चालना देण्याचा प्रयत्न केला. कोकणातील पहिले बंदिस्त नाट्यगृह म्हणून ओळख असलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले. हे काम सुरू असतानाच महर्षी कर्वे भाजीमंडई, मटणमार्केट व मच्छीमार्केट, पवन तलाव क्रीडांगण, नारायण तलाव सुशोभीकरण, महिला क्रीडासंकुलासारखी कामे एकावेळी सुरू केली. तब्बल १५ वर्षे यातील बहुतांशी प्रकल्प रखडले आहेत. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या नूतनीकरणाचे काम कसेबसे पूर्णत्वास गेले.शहरातील रावतळे परिसरात उभारण्यात येत असलेल्या महिला क्रीडासंकुलाच्या बाबतीतही तितकीच उदासीनता आहे. शहरातील महिलांसाठी बहुउद्देशीय क्रीडासंकुल उभारून तेथे बचतगट व अन्य महिला संघटनांना सामावून घेण्याचा प्रयत्न होता; परंतु अनेक वर्षे या प्रकल्पाचे काम अर्धवट आहे. याच पद्धतीने पवन तलाव क्रीडांगणाचे कामही वर्षानुवर्षे रखडले आहे. या कामातही लाखो रुपयांचा निधी खर्च करून कामे पूर्णत्वास गेलेली नाहीत.