
७० हजार रुपये किमतीची अल्युमिनियम कंडक्टर वायर चोरल्या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल.
चिपळूण तालुक्यातील कापसाळ येथील ठेकेदार विवेक वसंत भोजने (वय ३४) यांच्या ताब्यातील सुमारे ७० हजार रुपये किमतीची अल्युमिनियम कंडक्टर वायर चोरून नेल्याची घटना १८ जुलै २०२५ रोजी रात्री १.१५ च्या सुमारास घडली.प्रकरणी चिपळूण पोलिसांनी दोन आरोपींपैकी एकावर गुन्हा दाखल करत चोरीस गेलेले वायर बंडल आणि एक दुचाकी जप्त केली आहे.वायर बंडल हे मराठी शाळेजवळ आणि राजेश खेडेकर यांच्या घराजवळील उघड्या जागेत ठेवण्यात आले होते. हे वायर बंडल ५५ स्क्वेअर एमएम जाडीचे, ७५० मीटर लांबीचे व सुमारे १२० किलो वजनाचे होते. हे बंडल अकबर इकरार शेख (वय २१, रा. कापसाळ – मूळ उत्तर प्रदेश) आणि मिहीर मिलिंद नाचणकर (वय २१, रा. कापसाळ – मूळ रत्नागिरी) यांनी चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी विवेक भोजने यांनी चिपळूण पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ४० हजार रुपये किमतीची पॅशन प्रो मोटरसायकल (क्र. एमएच ०८ एई ३९०) आणि वायर बंडल जप्त केले. अकबर इकरार शेख याच्यावर १८ जुलै रोजी पहाटे ४ वाजून ५४ मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.