घरकुल’च्या लाभार्थ्यांना प्रत्येकी ५ ब्रास वाळू मोफत मिळणार : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह 

‘रत्नागिरी : शासनाच्या नवीन वाळू धोरणाबाबत योग्य ते मार्गदर्शन आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात २२ वाळू गटांपैकी ४ गटांचा लिलाव झाला आहे. यातून ५ कोटी ३३ लाखांचा महसूल शासनाला मिळाला. उर्वरित १८ वाळू गटाच्या लिलावाबाबत २८ जुलैला निविदा उघडल्या जाणार आहे. त्यामध्ये सर्व गटांचा लिलाव होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाकडे जुना २ हजार ७६३ ब्रास वाळू साठा आहे. त्याबाबत शासनाचे मार्गदर्शन आले असून घरकुलांच्या लाभार्थ्यांना प्रत्येकी ५ ब्रास वाळू मोफत देण्याचे आदेश आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात १८ जुलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी आदी उपस्थित होते.याबाबत अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, पर्यावरणाची परवानगी घेऊनच जिल्ह्यातील वाळू गटांचे मेरिटाईम बोर्डाकडून मूल्यांकन केले. त्यानंतर २२ ड्रेझर गटाची वाळू लिलाव प्रक्रिया ६ मेपासून सुरू झाली. यामध्ये जयगड गट १, दाभोळ २ आणि बाणकोट १ अशा चार गटांचा लिलाव झाला. यामध्ये ८८ हजार ४६९ ब्रास वाळू गेली. यातून ५ कोटी ३३ लाखांचा महसूल शासनाला मिळाला; परंतु उर्वरित १८ गटांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यासाठी फेर लिलाव प्रक्रिया करण्यात आली आहे. २८ जुलैला निविदा उघडल्या जाणार आहेत. यातून हे सर्व गटांचा लिलाव होईल आणि सुमारे ३३ कोटींच्यावर महसूल मिळेल, अशी अपेक्षा आहे.जिल्ह प्रशानाकडे सुमारे २ हजार ७६३ ब्रास जुना वाळू साठा आहे. या वाळू साठ्याचे काय करायचे याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले होते; परंतु बदलत्या वाळू धोरणामुळे हा विषय मागे पडला होता. आता शासनाच्या याबाबत स्पष्ट सूचना आल्या आहेत. जिल्ह्यात प्रगती पथावर असलेल्या घरकुलांना ५ ब्रास वाळू मोफत द्यावी, असे स्पष्ट केले आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेकडून घरकुलांची यादी मागवली आहे. त्यानुसार लाभार्थ्यांना ही वाळू दिली जाणार आहे.दरम्यान, पाच ब्रास वाळू घरकुलांना मोफत देण्याचा आदेश शासनाने काढला आहे. प्रत्यक्षात वाहतुकीच्या खर्चामुळे लाभार्थ्यांना ही वाळू विकतच घेतल्याप्रमाणेच आहे. कारण डेपोपासून ते घरकुलापर्यंत वाहतूक खर्च आणि वाळू भरण्याची मजूरी, असा सुमारे पंधराशे ते दोन हजार खर्च येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button