
1 कोटी 65 लाखांचं एक शौचालय, सगळ्यांचे डोक्याला हात : उदय सामंत म्हणाले चौकशी करू
भाजपचे आमदार अमित भास्कर साटम यांनी आकांक्षी शौचालय योजनेसंदर्भात विधानसभेत पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना केली. त्यांनी सांगितले की, पाच ठिकाणी हे प्रकल्प सुरू असून, प्रत्येकी १ कोटी ६५ लाख रुपये इतका खर्च दाखवण्यात आला आहे.म्हणजेच एका शौचालयासाठी तब्बल १ कोटी ६५ लाख रुपये खर्च केला जात आहे. इतक्या मोठ्या खर्चात ही शौचालये नेमकी किती आधुनिक आहेत, असा सवाल आमदार साटम यांनी उपस्थित केला.
यावर मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले पाच नव्हे तर सात ठिकाणी ही कामे सुरु आहेत. २०२३-२४ च्या जिल्हा नियोजनाच्या समीतीमधून १२ कोटीचा निधी यासाठी देण्यात आला आहे. उर्वरित निधी देण्याच्या सूचना तत्कालीन पालकमंत्र्यांनी केल्या आहेत. प्रती शौचालय १ कोटी ६५ लाख रुपये याप्रमाणे ही कामे सुरु आहेत हेही खरे आहे. परंतु त्यात काय शौचालय आधुनिक आहे हे मी देखील आजून तपासून बघितलं नाही असं सामंत म्हणाले.ही शौचालये अनधिकृत आहेत असं जे साटम यांनी सांगितलं आहे, त्याची शंभर टक्के चौकशी केली जाईल. त्यांनी मागणी केल्याप्रमाणे तीस दिवसांत ही चौकशी केली जाईल. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत सर्व कामाला स्थगिती दिली जाईल असं सामंत यांनी स्पष्ट केलं.त्यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर उठले ते म्हणाले, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे दीड कोटी रुपयाचं एक शौचालय हा नेमका कुठला खर्च आहे? याच्या मागचे आर्थिक गणित काय आहे ? याची खरे तर चौकशी केली पाहिजे. चौकशी करणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शिवाय फूटपाथवर या शौचालयांचे बांधकाम होणार आहे. अपंगांच्या स्टॉलसाठी आमच्या सारखे लोकप्रतिनीधी फूटपाथवर परवानगी मागता, त्यावेळी फूटपाथवर कुठल्याही प्रकारचं बांधकाम करायला सर्वोच्च न्यायालयापासून बंदी घातली आहे. असं सांगितलं जातं. मग ही शौचालये फूटपाथवर कशी बांधली जात आहेत असा सवाल करत ही कामं तत्काळ स्थगित नाही तर रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. त्यावर उदय सामंत म्हणाले, तीस दिवसांत आपण चौकशी करु व त्यातून जे काही निष्पन्न होईल त्यावर कार्यवाही करु असं सांगितलं.