
विधीमंडळ लॉबीतील हाणामारी प्रकरणी विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय
विधीमंडळाच्या लॉबीत गुरुवारी गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणाची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गंभीर दखल घेतली. जी घडना घडली ती गंभीर आहे. याबाबत सुरक्षा अधिकाऱ्यांनी अहवाल दिला असल्याचे नार्वेकर यांनी शुक्रवारी (दि.१८ जुलै) सभागृहात सांगितले.
या प्रकरणी ६ ते ७ जणावर मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात आली. दोघे जण परवानगी न घेता विधीमंडळ परिसरात आले. ते कोणत्याही स्वरूपाची परवानगी नसताना आणि अनधिकृतपणे सदस्यांसोबत आले. हे आक्षेपार्ह कृत्य असल्याचे नार्वेकर यांनी नमूद केले.
विधानभवन सभागृहात असे कधीही झाले नाही. मुळात त्या अभ्यांगतांना आत आणायची काहीही गरज नाही. असे अभ्यांगत आले तर त्यांची जबाबदारी संबंधित आमदारांची असते. या अप्रिय घटनेनंतर मी सर्व आमदारांना सांगतोय, विधीमंडळाची परंपरा जपण्याचे उत्तरदायित्त्व हे आमदारांचे आहे. आमदारांचे वर्तन हे विधीमंडळाची प्रतिमा उंचावणारे असावे. अशा पवित्र ठिकाणी सर्वांनीच काही नियम पाळणे गरजेचे आहे. म्हणूनच लोकसभेच्या धर्तीवर नितीमूल्य समिती गठीत केली जाईल. याबाबतचा निर्णय एका आठवड्यात घेतला जाईल. लोकसभेत यापूर्वी खासदारांचे निलंबनच नव्हे तर सदस्यत्वदेखील रद्द केले आहे. त्यामुळे सर्व आमदारांनी या समितीचे गांभीर्य घ्यावे, असा सूचना नार्वेकर यांनी केली.
यापुढे केवळ आमदार आणि त्यांच्या अधिकृत स्वीय सहाय्यकांनाच प्रवेश
गेल्या काही दिवसांत आमदारांचे वर्तन हे चिंतेची बाब आहे. आमदारकीची शपथ घेताना आपण संविधानाबाबत जे बोलतो त्याचे गांभीर्याने पालन करण्याची गरज आहे. म्हणून यापुढे फक्त आमदार आणि त्यांच्या अधिकृत स्वीय सहाय्यकांनाच प्रवेश दिला जाईल. बहुतेकवेळा मंत्री विधीमंडळात बैठक घेतात. पण आता मंत्र्यांनीही त्यांच्या बैठका मंत्रालयात घेण्याच्या सूचना देत आहोत. अपवादात्मक परिस्थितीत बैठक घेतली तर अभ्यांगतांना प्रवेश दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दोन्हीही अभ्यांगतांनी केलेले वर्तन हे विधीमंडळाची प्रतिमा मलिन करणारे आहे. म्हणून विधानसभा विशेषाधिकार समितीकडे मी दोघांचे प्रकरण वर्ग करत आहे. त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई केली जात आहे. पडळकर आणि आव्हाड यांनी दोघांनीही अभ्यांगतांना विधीमंडळात आणले. त्यामुळे दोघांनी याचा सभागृहात खेद व्यक्त करावा. तसेच यापुढे अशी घटना घडणार नाही, असे आश्वस्त करावे, अशी सूचना विधानसभा अध्यक्षांनी केली
त्यावर गोपीचंद पडळकर यांनी कालच्या घटनेबाबत सभागृहात खेद व्यक्त केला. मी आपण दिलेल्या सूचनांचे पालन करेन, असेही ते म्हणाले.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मी सभागृहात एकटाच येतो. मी कुणाच्या पासवर सही करत नाही. ज्यावेळी घटना घडली तेव्हा मी सभागृहात नव्हतो. या घटनेशी माझा कुठलाही संबंध नाही. मी कुणाला खुनावलेही नाही. या लोकशाहीच्या मंदिरात लोकशाही जिवंत आहे. मी मुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती दिली आहे. मला धमक्या येत होत्या, हे मी काल सांगितले होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यावर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणाले की, सर्व गोष्टी मला दालनात सांगितल्या आहेत. तुम्हाला हा विषय राजकीय करायचा असेल तर हे योग्य नाही.