
लांजा तालुक्यात कासारी-मुचकुंदी उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येणार.
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात कासारी-मुचकुंदी उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा झाली असून, या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या आर्थिक व औद्योगिक विकासाला नवसंजीवनी मिळणार आहे. मे. वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या खासगी कंपनीमार्फत या प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. या प्रकल्पाची स्थापित वीजनिर्मिती क्षमता १,७५० मेगावॅट असून, यासाठी अंदाजे ६,७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या एकाच प्रकल्पामधून थेट १,६०० लोकांना रोजगार मिळणार असून, स्थानिक तरुणाईसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे. कासारी-मुचकुंदी हा प्रकल्प म्हणजे एका व्यापक उर्जानिर्मिती धोरणाचा भाग असून, वॉटरफ्रंट कंपनी रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ६,४५० मेगावॅट क्षमतेचे विविध जलविद्युत प्रकल्प राबविणार आहे. यासाठी एकूण ३१,९५५ कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून एकत्रितपणे १५,००० रोजगार संधी निर्माण होतील. यामध्ये या जलविद्युत प्रकल्पांमुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासावर अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतील. राज्याच्या वाढत्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी हे प्रकल्प महत्त्वपूर्ण योगदान देतील, ज्यामुळे ऊर्जा सुरक्षेत वाढ होईल. प्रकल्पाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या वस्तू आणि सेवांची खरेदी स्थानिक स्तरावर केली जाईल ज्यामुळे लघु आणि मध्यम उद्योगांना चालना मिळेल. प्रकल्पांच्या उभारणीसाठी रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांचा विकास केला जाईल. ज्यामुळे परिसरातील कनेक्टिव्हिटी सुधारेल.www.konkantoday.com