
धामणसे येथे २९५ जणांची नेत्रतपासणी१२३ जणांना दिले मोफत चष्मे.
रत्नागिरी : तालुक्यातील धामणसे येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त अहमदाबादच्या जोशी टेक्नॉलॉजी इंटरनॅशनलच्या सहकार्याने आणि नंदादीप नेत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराला उदंड प्रतिसाद लाभला. यामध्ये २९५ जणांची नेत्रतपासणी करण्यात आली. तसेच १२३ लोकांना मोफत चष्मे देण्यात आले.ग्रंथालयाच्या स्व. डी. एम. जोशी सभागृहात हे शिबिर झाले. या शिबिराचे उद्घाटन रत्नेश्वर ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुळकर्णी, सरपंच अमर रहाटे, सेल्फ लेस सर्विंग सोसायटीच्या संचालिका कोनिका दत्त, मानसशास्त्रज्ञ गौरी चाफेकर, नंदादीप नेत्रालयाचे विपणन अधिकारी हृषिकेश मयेकर व ग्रंथालय संचालक, ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या वेळी कोनिका दत्त यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. तसेच जोशी टेक्नॉलॉजीसोबत आपण दहा वर्षे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असून यापुढेही धामणसे गावात विद्यार्थी, महिलांसाठी उपक्रम राबवू. श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे खूप कौतुक वाटते. एक ग्रंथालय गावच्या विकासासाठी असे उपक्रम राबवते हे दुर्मिळ उदाहरण म्हणावे लागेल.संस्था अध्यक्ष उमेश कुळकर्णी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की वाचनालयात वाचकांनी यावं त्यांना वाचनालयकडे येण्यासाठी असे विविध प्रकारचे उपक्रम राबविले जात आहेत.वर्षभर असे कार्यक्रम आयोजित करण्याचे आम्ही संचालक मंडळाने ठरवले आहे.
सकाळी 11 ते दुपारी 5 वाजेपर्यंत शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थांची नेत्र तपासणी करण्यात आली. २९५ ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली. तसेच १२३ जणांना वाचनासाठी मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. रत्नागिरी जिल्हा कृषी, औद्योगिक संघ संचालक व ग्रामपंचायत सदस्या सौ. ऋतुजा उमेश कुळकर्णी, तंटामुक्ती अध्यक्ष दीपक जाधव, ग्रंथालयाचे उपाध्यक्ष विलास पांचाळ, चिटणीस मुकुंद गणेश तथा बाळासाहेब जोशी, सदस्य प्रशांत रहाटे, अनंत जाधव, विश्वास धनावडे, सौ. स्मिता कुलकर्णी, ग्रामपंचायत सदस्य दीपक रेवाळे, ग्रंथपाल केशव कुळकर्णी, लिपिक अविनाश लोगडे, अन्वी वैभव वारशे ,आंबा व्यापारी बंड्या हर्षे, अनंत गोताड, मारूती लोगडे, दत्ताराम रेवाळे,माध्यमिक विद्यालयाचे श्री. संजय सुतार, श्री. गायकवाड, अंगणवाडी सेविका व मदतनीस, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. संपदा ढापरे व अन्य शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.