
कोणी कितीही आमिषे दाखवली तरी आम्ही आमच्या निश्चयापासून ढळणार नाही, लांजात डम्पिंग ग्राउंड वरून वाद पेटला.
डम्पिंग हटाव हा आमच्या अस्तित्वाचा लढा आहे. त्यात कोणताही राजकीय हेतू नसून आमच्या न्याय हक्कांसाठी तो आम्ही पुकारलेला आहे. आणि जोपर्यंत डम्पिंग रद्द होत नाही तोपर्यंत आमचा लढा हा असाच कायम चालू राहिल.कोणी कितीही आमिषे दाखवली तरी आम्ही आमच्या निश्चयापासून ढळणार नाही, अशी रोखठोक भूमिका कोत्रेवाडी येथील नागरिकांनी घेतली आहे.दरम्यान, लांजा नगरपंचायत प्रशासन नागरिकांच्या संयमाचा बांध फुटण्याची वाट पाहत आहे का? असा सवाल करतानाच यातूनच भविष्यात काही प्रकार घडला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही लांजा नगरपंचायत प्रशासनावर राहील, असा इशारा कोत्रेवाडी नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.लांजा नगरपंचायतीच्या वतीने कोत्रेवाडी येथे वाडीवस्ती लगत डम्पिंग ग्राउंड प्रकल्प प्रस्तावित आहे. लगतच असणारी वस्ती, सार्वजनिक पाण्याच्या विहिरी यामुळे भविष्यात या ठिकाणी रोगराई वाडून लोकांचे जीवनमान बिघडणार आहे .वाडीवस्ती बाधित होणार असून भावी पिढीला देखील धोका निर्माण होणार आहे. आणि म्हणूनच कोत्रेवाडी येथील नागरिकांच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून डम्पिंग ग्राउंड विरोधात संघर्षाचा लढा पुकारण्यात आलेला आहे.