आजीची भाजी रानभाजी शीतल काटेमाठ अन् कवळी..

रानभाज्या या खऱ्या तर आरोग्याचा खजिना असतात. ‘आजी आणि तिची रानभाजी’ ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि मानवी आरोग्य समृध्द करणारी तिची रानभाजी या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे. अशा रानभाज्यांची ओळख करुन देणारी ‘आजीची भाजी रानभाजी’ ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सुरु केलेल्या या मालिकेत आजच्या भाज्या आहेत काटेमाठ अन् कवळी..

काटेमाठ ही एक औषधी वनस्पती आहे. ही वनस्पती तिच्या औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. स्वभावतः थंड असून मूत्रविसर्जनात मदत करते. पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि भूक वाढवणारी आहे. ताप कमी करण्यास आणि पित्तप्रकोप व रक्तविकारांवर नियंत्रण ठेवण्यास उपयुक्त आहे. दम्यासारख्या श्वसनविकारांवरही ही वनस्पती लाभदायक आहे.मूळव्याधीवर आणि स्त्रियांच्या मासिक पाळीच्या विकारांवर काटेमाठ गुणकारी आहे. गर्भाशयाचे कार्य सुधारते आणि गर्भधारणेची शक्यता वाढवते. इसबाच्या त्वचारोगावर काटेमाठाची पाने वाटून लेप केला जातो, ज्यामुळे दाह कमी होतो. काटेमाठाची पाने व मुळे उकळून लहान मुलांना रेचक म्हणून देतात. मुळे जंतुनाशक म्हणून वापरली जातात. तसेच, दूध वाढवण्यासाठी काटेमाठाचे खोड व पाने तुरीच्या डाळीबरोबर उकडून देतात. काटेमाठ ही एक बहुउपयोगी औषधी वनस्पती असून, ती विविध आरोग्य समस्यांवर नैसर्गिक उपाय म्हणून वापरली जाते.

भाजी प्रामुख्याने सुकी आणि पातळ भाजी अशा दोन प्रकारात बनवतात. सुकी भाजी बनवण्यासाठी कोवळी पाने आणि कोवळ्या फांद्या वापरल्या जातात. प्रथम पाने निवडून स्वच्छ धुवून घ्यावीत. कांदा व मिरच्या चिरून घ्याव्यात. तेलात चिरलेले कांदे गुलाबी होईपर्यंत परतावेत. नंतर मिरच्यांचे तुकडे व लसूण पाकळ्या फोडणीत टाकाव्यात. त्यानंतर त्यात भाजी घालावी. गरजेनुसार पाण्याचा हबका मारून झाकण ठेवून भाजी शिजू द्यावी. भाजी परतून अर्धवट शिजल्यावर चवीनुसार मीठ घालावे. भाजी शिजल्यावर ओले खोबरे व कोथिंबीर घालावी.

पातळ भाजी करताना भाजी कोवळी पाने व पाने देठा निवडून घ्यावेत. तुरीची डाळ प्रथम शिजवून घ्यावी आणि त्यात मीठ, हळद घालून चांगली घोटावी. तेलात मोहरी, मिरच्यांचे तुकडे, लसूण पाकळ्या टाकून फोडणी द्यावी. नंतर त्यात भाजी घालून परतून घ्यावी. दोन-तीन वाफा आल्यानंतर शिजवलेली तुरीची डाळ ओतावी. आवडीनुसार, चवीनुसार गुळ, आमसूल घालूनही भाजीला चांगली उकळी येऊ द्यावी. चविष्ट भाजीचा आस्वाद घ्या.कवळी भाजी ही पावसाळ्यात उगवणारी एक महत्त्वपूर्ण रानभाजी आहे. महाराष्ट्रात, विशेषतः ग्रामीण भागात, ही भाजी तिच्या औषधी गुणधर्मांमुळे ओळखली जाते. कवळी भाजी साधारणपणे पावसाळा सुरू झाल्यानंतर आठ ते दोन आठवड्यांच्या आत डोंगराळ भागात किंवा शेतात आपोआप उगवते. ही भाजी शिजवून खाण्यासाठी योग्य असते. अनेक घरांमध्ये कुलदेवतेच्या पूजेनंतर ही भाजी देवाला नैवेद्य म्हणूनही अर्पण केली जाते. कवळीची पाने लांबट आणि पन्हट स्वरूपाची असतात. या भाजीला बाजारातही चांगली मागणी असते, कारण ती सहज उपलब्ध नसते आणि तिच्यातील औषधी गुणधर्मांमुळे लोक ती आवर्जून खरेदी करतात.

ही केवळ एक रानभाजी नसून, ती अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. तिच्या विविध भागांचा उपयोग पारंपरिक औषधोपचारात केला जातो. कवळीच्या मुळांना अनमोल औषधी गुणधर्म असल्याने बाजारात त्यांना मोठी मागणी असते. साधारण पावसाळ्यात सुरुवातीच्या पंधरा दिवसांत कवळीची भाजी जंगलात उगवते. या भाजीच्या मुळाला सफेद मुसळी असेही संबोधले जाते. ही मुसळी अनेक आजारांवर रामबाण उपाय ठरली आहे. कवळीच्या मुळामध्ये ‘सॅपोनिन्स’ हा उत्तेजक घटक असतो, ज्याचा उपयोग शक्तिवर्धक, टॉनिक म्हणून केला जातो. कवळीच्या मुळांचा उपयोग कावीळ, दमा, लघवीची जळजळ, अतिसार आणि पोटदुखी यांसारख्या आजारांवर केला जातो. हे गुणधर्म तिला एक प्रभावी औषधी वनस्पती बनवतात.

ही भाजी लहान मुलांना दूध पचनासाठी आणि दूधवाढीसाठी उपयुक्त आहे, असे मानले जाते. त्यामुळे ज्या मातांना दूध कमी येत असेल, त्यांच्यासाठी ही भाजी फायदेशीर ठरू शकते. शुक्रजंतुपोषक आणि मधुमेही लोकांसाठी गुणकारी मानली जाते. तिच्या नियमित सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते.

कवळी भाजी ही केवळ एक चवदार रानभाजी नसून, ती अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. निसर्गाने दिलेल्या या देणगीचा योग्य वापर करून आपण अनेक आरोग्य समस्यांवर मात करू शकतो. तिच्या औषधी गुणधर्मांमुळे, कवळी भाजीला आपल्या आहारात आणि पारंपरिक औषधोपचारात एक महत्त्वाचे स्थान आहे.

*-प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते* *जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी* *मो. क्र. 9403464101*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button