
सिगारेट पेटविण्यास लायटर दिला नाही, या शुल्लक कारणावरून एका परप्रांतीय कामगाराने आपल्या सहकारी कामगाराच्या डोक्यात टॉमी मारून केला खून
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातवरेरी कुळये सडेवाडीनजिक सिगारेट पेटविण्यास लायटर दिला नाही, या शुल्लक कारणावरून एका परप्रांतीय कामगाराने आपल्या सहकारी कामगाराच्या डोक्यात टॉमी मारून त्याचा निघृण खून केल्याची खळबळजनक घटना देवगड तालुक्यातील वरेरी कुळये सडेवाडीनजिक एका चिरेखाणीवर घडली आहे.कृष्णकुमार जुगराज यादव (२०, मूळ रा. मध्यप्रदेश, सध्या रा. वरेरी कुळये सडेवाडीनजीक चिरेखाण) असे मृत व्यक्तिचे नाव असून संशयित रितीक दिनेश यादव (२०, मूल रा. मध्यप्रदेश, सध्या रा. वरेरी कुळये सडेवाडीनजीक चिरेखाण) याला देवगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना बुधवारी सकाळी ६ वा. च्या सुमारास उघडकीस आली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वरेरी कुळये सडेवाडीनजीक शिवराम शांताराम जाधव यांच्या जागेत उमेश गंगाराम गवाणकर यांची चिरेखाण आहे. या चिरेखाणीवर सुमारे ८ ते १० परप्रांतीय कामगार कामास आहेत. यात नात्याने चुलतभाऊ असलेले कृष्णकुमार यादव व संशयित रितीक यादव हे दोघेही कामाला होते. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हे दोन्ही भाऊ चिरेखाणीवरील एका ट्रकमध्ये झोपण्यासाठी गेले होते. यावेळी संशयित रितीक याचा सिगारेट ओढण्याचा लायटर कृष्णकुमार याच्याजवळ होता. रितीक याने त्याच्याजवळ लायटरची मागणी केली. यावेळी त्यांच्यात वाद झाला. कृष्णकुमार याने रागाच्या भरात रितीक याच्या कानशीलात लगावली व तो ट्रकबाहेर निघून आला. मात्र हा राग मनात ठेवून संशयित रितीक याने ट्रकमधील टॉमी घेत कृष्णकुमार याचा मागून चिरेखाणीपर्यंत गेला व संशयितांनी कृष्णकुमार याच्या डोक्यात टॉमीने जोरदार प्रहार केला. हा वार वर्मी लागल्याने कृष्णकुमार याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर संशयितांनी टॉमी चिरेखाणीतील पाण्यात फेकून देत तेथून काढता पाय घेतला. दरम्यान तळेबाजार येथे राहणारा चिरेखाणीचा मुकादम विजय अण्णापा शेंडगे हा बुधवारी सकाळी ६ वाजता नेहमीप्रमाणे तो चिरेखाणीवर गेला यावेळी त्याला कृष्णकुमार व रितीक हे दिसले नाहीत. त्यामुळे त्याने इतर कामगारांसमवेत त्या दोघांचा चिरेखाण परिसरात शोध घेतला. यावेळी कृष्णकुमार हा चिरेखाणीत मृत अवस्थेत दिसून आला. तर त्याचा चुलतभाऊ रितिक हा घटनास्थळी दिसून न आल्याने मुकादम व कामगारांनी रितीक याचा शोध घेतला. रितीक हा तळेबाजार बाजारपेठ येथे दिसून आल्यानंतर मुकादम शेंडगे याने त्याला आपल्या सोबत ठेवले व तात्काळ या घटनेची माहिती त्याने पोलिस पाटील मुकेश पारकर यांना फोनवरून दिली. पोलिस पाटील पारकर यांनी या घटनेची माहिती देवगड पोलिस स्थानकात दिल्यानंतर देवगड पोलिस निरिक्षक भरत धुमाळ हे आपल्या सहकारी कर्मचायांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयित रितीक याला ताब्यात घेतले. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा केला.