
मानहानी प्रकरण: नारायण राणेंना दिलासा नाहीच, समन्स रद्द करण्याचा अर्ज फेटाळला!
मुंबई : शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या फौजदारी दाव्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने बजावलेल्या समन्सप्रकरणी विशेष न्यायालयाने भाजप खासदार नारायण राणे यांना दिलासा देण्यास नकार दिला. तसेच, राणे यांनी हे समन्स रद्द करण्याच्या मागणीसाठी केलेला अर्ज फेटाळला.
भांडुप येथे १५ जानेवारी २०२३ रोजी आयोजित कोकण महोत्सवाला संबोधित करताना, मतदार यादीत संजय राऊत यांचे नाव नव्हते आणि आपण शिवसेनेत असताना त्यांना राज्यसभेवर निवडून येण्यास मदत केली होती, असे वक्तव्य राणे यांनी केले होते. त्यावर, आपल्याविरोधात हेतुतः खोटी टिप्पणी केल्याचा दावा करून राऊत यांनी राणे यांच्याविरुद्ध फौजदारी मानहानीचा दावा दाखल केला होता.
माझगाव येथील दंडाधिकारी न्यायालयाने एप्रिलमध्ये राणे यांना समन्स बजावले होते. राणे यांनी सार्वजनिक मेळाव्यात राऊत यांच्याविरुद्ध बदनामीकारक विधाने केली होती आणि ती वर्तमानपत्रांनी प्रकाशित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी प्रसारित केली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे तक्रारदाराची प्रतिष्ठा मलिन झाल्याचे सकृतदर्शनी सिद्ध होत असल्याचे दंडाधिकारी न्यायालयाने राणे यांना समन्स बजावताना म्हटले होते. त्या समन्सला राणे यांनी खासदार-आमदारांच्याविरुद्ध दाखल खटल्यांचे कामकाज पाहणाऱ्या विशेष न्यायालयात आव्हान दिले होते.
तसेच, आपल्याविरुद्ध कोणताही मानहानीचा दावा होऊ शकत नसल्याचे आणि कोणतेही कारण न देता दंडाधिकाऱ्यांनी समन्स बजावल्याचे राणे यांनी अर्जात म्हटले होते. त्यांच्या अर्जाला राऊत यांनी विरोध केला होता.