
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस
राज्यातील बेपत्ता झालेली बालके, महिला व मुलींचा शोध घेण्यासाठी ‘ऑपरेशन मुस्कान’ आणि ‘ऑपरेशन शोध’ या दोन मोहिमा हाती घेण्यात आल्या आहेत. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बेपत्ता बालके, मुली आणि महिलांचा शोध घेण्यात यश आले.१७ एप्रिल ते १५ मे २०२५ या एक महिन्याच्या काळात बेपत्ता ६,३२४ महिला आणि बालकांचा शोध लावण्यात आला असून त्यात ४,९०६ महिला व १,३६४ बालकांचा समावेश आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.
आमदार सुनील शिंदे यांनी, तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून २०१९ ते २०२१ या काळात अनेक मुली बेपत्ता झाल्या असून, त्याची संख्या किती आहे, असा प्रश्न विचारला; तर आमदार चित्रा वाघ यांनी बेपत्ताच्या तक्रारी देण्यासाठी मुलीचे आई-वडील पुढे येत नसल्याने हे प्रमाण मोठे आहे का? असा सवाल केला. त्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले.
‘ऑपरेशन मुस्कान’ इतर राज्यांनीही स्वीकारले
घरगुती हिंसाचार, कौटुंबिक वादामुळे घर सोडलेल्या महिलांचे ‘भरोसा’ या वन स्टॉप केंद्राद्वारे समुपदेशन करून त्यांना संरक्षण व कायदेशीर मदत दिली जाते. शालेय स्तरावर ‘पोलिस काका-दीदी’ उपक्रमांमध्ये ‘मिसिंग पर्सन’ची माहितीही समाविष्ट केली जाणार आहे.
‘ऑपरेशन मुस्कान’ची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून अनेक राज्यांनीही ही योजना स्वीकारली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.