
चोरट्याला बँकेत शिरूनही पैसे मिळाले नाहीत मग त्याने लांबवले लॅपटॉप आणि स्कॅनर
खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील सातत्याने गजबजलेल्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेत एक चोरटा तब्बल साडेचार तास थांबला. मात्र, काहीच पैसे हाती न लागल्याने अखेर लॅपटॉप, रोख रकमेची ने-आण करण्यासाठी वापरली जाणारी सुटकेस, स्कॅनर आणि अन्य काही किरकोळ साहित्य चोरण्यावरच त्याला समाधान मानावे लागले.लोटे परशुराम वसाहतीत मुंबई- गोवा महामार्गालगत असणाऱ्या बँक ऑफ इंडिया ही शाखा मागील पन्नास वर्षांपासून कार्यरत आहे. शनिवार, दि. १२ व रविवार, दि. १३ रोजी बँकेला सुटी होती. याचा फायदा घेऊन चोरट्याने रविवारी सायंकाळी साडेचार वाजता बँकेच्या मागील बाजूने खिडकीची लोखंडी जाळी तोडून आत प्रवेश केला. बरेच प्रयत्न करूनही रोख रक्कम वा दागिने त्याच्या हाती लागले नाहीत. ते मिळविण्यासाठी तो साडेचार तास बँकेत वावरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.
अखेर काहीच किमती वस्तू हाताला लागत नसल्याने त्याने बँकेतील एक लॅपटॉप, रोख रकमेसाठी वापरण्यात येणारी सुटकेस, एक स्कॅनर व अन्य साहित्य चोरून नेले.