क्रॉर्फड भूखंड लिलाव प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप! मच्छिमार संघटनेची आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार!

मुंबई :* क्रॉफर्ड मार्केट येथील पलटण रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज मासळी मंडईच्या भूखंड लिलाव प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप आखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने केला आहे. या लिलाव प्रक्रियेत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय संघटनेने व्यक्त केला आहे. गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी करीत संघटनेने आझाद मैदान पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे. त्यामुळे पालिकेचा भूखंड लिलाव वादात सापडला आहे.मुंबई महापालिकेने महसूल वाढीसाठी मुंबईतील दोन भूखंडांची लिलावाने विक्री करण्यात आली. कॉफर्ड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडईची जागा आणि वरळीतील अस्फाल्ट प्लांटची जागा अशा दोन जागांचा लिलाव करण्यात आला. त्यापैकी क्रॉफर्ड मार्केट येथील लिलाव प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून वादात सापडली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील मच्छीमारांनी या लिलावाला विरोध केल्यामुळे या भूखंडावरून वाद झाला आहे. त्यातच मच्छीमार संघटनेने आता या लिलाव प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करीत पोलीस ठाण्यात तक्रार केल्यामुळे हा वाद आणखी वाढला आहे.याबाबत महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी सांगितले की, हा भूखंड एका कंपनीला नाममात्र ३६९ कोटी रुपयाने ३० वर्षांच्या भाडेकरारावर बहाल करण्यात आला असून पुढील ३० वर्षांसाठी १ ते १००१ रुपये भाडेकराराने देण्यात आल्याने या लिलाव प्रक्रियेत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय निर्माण होत आहे. या लिलावामुळे मुंबईचे आद्य नागरिक असलेल्या कोळी समाजाचा व्यवसाय कायमचा नष्ट करण्याचा डाव मुंबई महापालिकेकडून होत असल्याचा आरोपही तांडेल यांनी केला आहे.त्यामुळे या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी आखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे. तसेच आझाद मैदान पोलीस ठाण्यात लेखी तक्रार करण्यात आल्याची माहिती समितीचे देवेंद्र तांडेल यांनी दिली.

लिलावात झालेल्या गैरव्यवहारात संशय निर्माण होत असून सदर प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून कंपनीला दिलेला एलओआय रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.*मच्छीमार संघटनेचे आक्षेप*भूखंडाची रक्कम २१७५ कोटी रुपयांवरून ६२९ कोटी रुपये इतकी कमी कशी झाली तसेच प्रत्यक्ष विक्री ही ३६९ कोटींना करण्यात आली, याबाबतही तांडेल यांनी आक्षेप घेतला आहे. मुंबई महानगर पालिकेने या भूखंड लिलावासाठी ज्या अटी ठेवल्या होत्या त्याचाही भंग केला असल्याचा आरोप तांडेल यांनी केला आहे. इच्छुक कंपनीची वार्षिक उलाढाल ५०० कोटी रुपये आणि कंपनीची निव्वळ मालमत्ता मागील तीन आर्थिक वर्षांसाठी रुपये २०० कोटी पर्यंत बंधन असताना ज्या कंपनीची स्थापना २०२३ मध्ये झाली अशा कंपनीला भूखंड बहाल कसा केला असे सवाल तांडेल यांनी केले आहेत.

या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मच्छिमार संघटनेने २२ जुलै रोजी जन आक्रोश मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चामध्ये २५ हजार कोळी बांधव सहभागी होणार असल्याचा दावा समितीचे कार्याध्यक्ष बर्नाड डिमेलो यांनी केला आहे.दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील मासळी विक्रेत्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन हे महात्मा जोतिबा फुले मंडई पुनर्विकास प्रकल्पातील इमारतीमध्ये करण्यात येणार आहे. मात्र या मंडईतील जागा अपुरी असल्याचा दावा मच्छिमार संघटनेने केला आहे. तसेच हा भूखंड मच्छिमार संघटनेला विकत देण्याचा प्र्स्तावही संघटनेने पालिकेकडे पाठवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button