
आजीची भाजी रानभाजी तंतुमय बांबू आणि बहुगुणी कुडा
*आसाम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या ‘थ्री सिस्टर्स’ राज्यांमध्ये पर्यटकांना प्रामुख्याने जागोजागी प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पांढरे कोंब भरुन ठेवल्याचे आढळते. हे बांबूचे लोणचे असते. या राज्यांमध्ये खास करुन आदिवासींच्या जीवना जवळ नेणारी खास ‘खरोली’ थाळी इथे मिळते. या थाळीमध्ये सर्व रानभाज्यांचे पदार्थ असतात. बांबूच्या कोवळ्या कोंबापासून भाजी, लोणचे असे पदार्थ पर्यटनाच्या निमित्ताने चाखायला हरकत नाही.
‘आजी आणि तिची रानभाजी’ ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि मानवी आरोग्य समृध्द करणारी तिची रानभाजी या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे. अशा रानभाज्यांची ओळख करुन देणारी ‘आजीची भाजी रानभाजी’ ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सुरु केलेल्या या मालिकेत आजच्या भाज्या आहेत बांबू आणि कुडा..

बांबू ही खूपच तंतुमय शिवाय ही क्षारयुक्त वनस्पती असल्यामुळे शरीराला तंतू आणि क्षार दोन्ही मिळतात. बाळंतपणात गर्भाशयाची पूर्ण शुध्दी होण्यासाठी ही भाजी बाळंतिणीला देतात. भूक आणि पचनशक्ती दोन्ही वाढते. बांबू पिकला की खोडाच्या पेरात एक स्त्राव जमा व्हायला लागतो. त्यास ‘वंशलोचन’ म्हणतात. हे दम्यावरील उत्तम औषध आहे. बांबूच्या मुळांचा रस स्थूलता आणि मधुमेह विकारांवर रामबाण उपाय आहे.

कोंब आल्यावर त्याची सालं काढून तो बारीक चिरुन रात्रभर पाण्यात घालून ठेवायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी काढून टाकायचे नव्या पाण्यात कोंब घालून कुकरच्या तीन शिट्टया काढायच्या. त्यामधील पाणी काढून टाकायचे. कढईत तेल तापवून जिरे, मोहरी, हिंग, हळद, बारीक चिरलेला कांदा, थोडी चणाडाळ आणि चवीपुरते मीठ घालून फोडणी करावी. कांदा शिजला की तिखटाबरोबर वाफवलेले कोंब घालायचे. गुळ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून झाकण ठेवून एक वाफ काढावी. हवे असल्यास ओले खोबरे देखील यामध्ये घालता येते.
*कुडा*
ही एक बहुगुणी औषधी वनस्पती आहे. जी स्थानिक पातळीवर ‘पांढराकुडा’ म्हणून ओळखली जाते. तिच्या विविध औषधी गुणधर्मांमुळे आयुर्वेदिक आणि पारंपरिक औषध पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.

कुड्याची फुले पांढरी शुभ्र असून, ती आकर्षक दिसतात. या झाडाला लांब शेंगा येतात, ज्या जोडीने वाढतात. कुड्याच्या सालीचा उपयोग त्वचा विकारांवर होतो. कुटजारिष्ट हे प्रसिद्ध औषध कुड्याच्या सालीपासून बनवले जाते.
कुड्याची मूळे, साल, आणि बिया मूळव्याध, रक्तस्रावयुक्त मूळव्याध आणि अतिसारासारख्या पोटाच्या विकारांवर अत्यंत गुणकारी आहेत. कुड्याच्या सालीचा वापर विविध त्वचा विकारांच्या उपचारात होतो. कुड्याच्या बियांचे चूर्ण नियमितपणे घेतल्यास अन्नपचन सुधारते आणि पोटात वायू धरत नाही, ज्यामुळे पोटासंबंधी समस्या कमी होतात. कुड्याची पाने शक्तीवर्धक असून, स्नायूंचे दुखणे कमी करण्यास मदत करतात. थोडक्यात, कुडा ही एक बहुउपयोगी औषधी वनस्पती असून, ती विविध आजारांवर नैसर्गिक उपाय म्हणून वापरली जाते. तथापि, कोणत्याही औषधी वनस्पतीचा वापर करण्यापूर्वी योग्य वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.
*- प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते* *जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी* *मो. क्र. 9403464101*