
रत्नागिरी तालुक्यात लावणी अंतिम टप्प्यात.
रत्नागिरी*- रत्नागिरी तालुक्यात समाधानकारक पाऊस सुरू असल्यामुळे लावणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. आतापर्यंत ८० टक्के लावणी पूर्ण झाली आहे. चार दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारपासून पुन्हा जोरदार सुरुवात केल्यामुळे पुढील आठ दिवसांत लावणीची कामे पूर्णत्वास जाणार आहेत.यंदा १५ मे रोजीच पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचे वेळापत्रक बिघडले होते. त्याचा परिणाम अनेक व्यवसाय, रस्ते, बांधकामे आदींवरही झाला. या पावसामुळे प्रतिवर्षी होणारी पाणीटंचाई दूर झाली असली, तरी पेरणीपूर्व मशागतीची कामे रखडली होती. मात्र जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांनी पेरणी करून घेतली. त्यानंतर सुरू झालेला पाऊस कायम आहे. गेल्या चार दिवसांचा अपवाद वगळता पाऊस चांगला पडत असल्याने शेतकरी आनंदी आहेत. पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेतकऱ्यांनी लावणी आटोपून घेतली आहे. रत्नागिरी तालुक्यामध्ये सोमवारी १४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत १०५३ मिलिमीटर पाऊस पडला.