
पृथ्वीवर ‘शुभ’ अवतरण; शुभांशू शुक्ला वीस दिवसांनी परतले
भारताच्या आगामी अवकाश मोहिमांच्या तयारीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असलेल्या ‘अॅक्सिओम-४’ मोहिमेची मंगळवारी यशस्वी सांगता झाली. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात अठरा दिवस राहिल्यानंतर भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह चारही अंतराळवीर भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी (ता.१५) दुपारी पृथ्वीवर सुखरूप परतले. ‘ग्रेस ड्रॅगन’ अंतराळयानाने दक्षिण कॅलिफोर्नियातील सॅन दिएगो किनाऱ्याजवळ भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी समुद्रात यशस्वी ‘लँडिंग’ केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संपूर्ण देशवासीयांनी या घटनेबद्दल आनंद आणि समाधान व्यक्त केले, तर शुभांशूच्या आई-वडिलांच्या मनात कृतार्थतेची भावना दाटून आली.अंतराळातून ”आजही भारत सारे जहाँसे अच्छा दिसतो,” अशा भावना व्यक्त करणारे आणि देशातील आगामी अंतराळवीरांसाठी प्रेरणा ठरलेले शुक्ला आणि त्यांचे तीन सहकारी यानातून बाहेर आले आणि त्यांनी हसतमुख चेहऱ्याने कॅमेऱ्याकडे पाहून हात हालविला.
शुभांशू यांचा हा ‘व्हिडिओ’ काही क्षणातच व्हायरल झाला. या अंतराळवीरांनी एकूण २२.५ तास प्रवास केला. शुभांशू शुक्ला, कमांडर पेगी व्हिटसन, आणि मोहिमेचे विशेषज्ञ स्लावोश उझनान्स्की-व्हिस्निएव्हस्की (पोलंड) आणि टिबोर कापू (हंगेरी) यांनी सोमवारी दुपारी आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रातून अंतराळयानातून आपला परतीचा प्रवास सुरू केला होता. ”ड्रॅगन अंतराळयानाचे पाण्यात यशस्वी लँडिंग झाले. पृथ्वीवर परत आल्याबद्दल स्वागत,” असे ‘स्पेस एक्स’ने ‘एक्स’वर नोंदविलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.