
जिल्ह्यातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी: फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, एमआयडीसी मिरजोळेत मंगळवारी रोजगार मेळावा.
रत्नागिरी, दि. १६ – जिल्ह्यातील नोकरी शोधणाऱ्या तरुणाईसाठी एक आनंदाची बातमी आहे. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या मार्गदर्शनाखाली येत्या २२ जुलै रोजी, सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत येथील फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, एमआयडीसी मिरजोळे येथे एका भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात जिल्ह्यातील अनेक नामांकित उद्योजक, सेवा क्षेत्रातील कंपन्या आणि सहकारी संस्था सहभागी होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने गद्रे मरिन एक्सपोर्ट प्रा. लि., जीवन विमा निगम, श्री स्वामी स्वरूपानंद सहकारी संस्था, पेठे ब्रेक मोटर्स प्रा. लि. (मोडकाघर, पो. वेरवली, ता. गुहागर), आणि एमआय लाईफ स्टाईल ग्लोबल प्रा. लि. (पांडवनगर टी.आर.पी.) यासारख्या आस्थापनांचा समावेश आहे. या कंपन्यांनी विविध पदांसाठी जवळपास ५०० उमेदवारांची मागणी नोंदवली आहे. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी जिल्ह्यातील सर्व पात्र उमेदवारांना या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
इच्छुकांनी दिनांक २२/०७/२०२५ रोजी थेट फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, एमआयडीसी मिरजोळे, रत्नागिरी येथे आपला बायोडाटा आणि इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह मुलाखतीसाठी उपस्थित राहावे आणि या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात सक्रिय सहभाग घ्यावा.
ही संधी तुमच्या करिअरला नवी दिशा देऊ शकते! वेळेवर उपस्थित राहून या संधीचा पुरेपूर फायदा घ्या.