
आजीची भाजी रानभाजी ॲन्टीऑक्सीडंट युक्त आळंबी
पावसाळ्यात विविध गुणधर्म असणाऱ्या अनेक वनस्पती उगवतात त्यातील अनेक वनस्पती या खाण्यायोग्य असतात. विशेषत: आदिवासींनी या शोधून काढल्या आहेत. अनेक पिढ्यांपासून त्या जपल्याही आहेत. या रानभाज्यांना ओळख मिळवून त्यांची लागवड, उत्पादन, विक्री अशी साखळी निर्माण करुन शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास मदत मिळणार आहे.
‘आजी आणि तिची रानभाजी’ ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि मानवी आरोग्य समृध्द करणारी तिची रानभाजी या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे. अशा रानभाज्यांची ओळख करुन देणारी ‘आजीची भाजी रानभाजी’ ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सुरु केलेल्या या मालिकेत आजच्या भाज्या आहेत अळंबी, फोडशी आणि अळू..
अरण्यऋषी दिवंगत मारुती चित्तमपल्ली यांच्या ‘केशराचा पाऊस’ या पुस्तकातील ‘जंगलातील वनस्पती शास्त्रज्ञ’ या लेखात अस्वलांचा वावर ओळखताना आळंबीचा उल्लेख येतो. पावसाळ्यात विपुल प्रमाणात जंगलात वाढणाऱ्या बिनविषारी आळंबी ओळखून अस्वल खातात. खाण्यापेक्षा कित्येकदा अधिक नासधूस करतात. हे करताना खाल्लेल्या आळंबीचे अवशेष जागेवर पडलेले असतात. त्यापासूनच बिनविषारी आळंबी आदिवासी ओळखायला शिकला ते अस्वलापासून. आळंबीमध्ये ॲन्टीऑक्सीडंट, प्रथिने, व्हीटॕमीन डी, सेलेनियम आणि झिंक असते. प्रोटेस्ट व स्तनाच्या कर्करोगामध्ये ते गुणकारी असते.
आळंबी उकळून रोज नाश्त्यामध्ये खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते. मधुमेहींसाठी रक्तातील साखर नियंत्रित राखण्यासाठी उपयोग होतो. यातील सेलेनियममुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हृदय रोगासाठी याचे सेवन उपयुक्त आहे. गॅस, अपचन, पोटदुखी यासारख्या आजारात गुणकारी.
कळी असणाऱ्या आळंबी पाण्याने स्वच्छ धुवून व पुसून घ्यावी. हळद व मिठाच्या पाण्यात अर्धा तास बुडवून ठेवावी. पाण्याचा रंग लाल झाला, तर ती विषारी आहेत, असे समजावे. रंग तसाच पिवळा राहिल्यास ती खाण्यास उपयुक्त समजावे.
आळंबी कापून घ्यावीत. कढईत तेल गरम करुन कांदा परतून घ्यावा. मसुर घालून चांगली परतून घ्यावी व एक वाफ काढावी. त्यानंतर मसाला घालून परतावा व आळंबी घालावी. चवीनुसार मीठ, कोकम घालून वाफ काढून घ्यावी. त्यानंतर ओल्या नारळाचे वाटण व पाणी घालावे. मसूर शिजल्यानंतर खाण्यासाठी वाढून घ्यावे.
*फोडशी*
कार्ली, कुली, पेवा अशी याला स्थानिक नावे आहेत. भाजी धुवून बारीक चिरुन घ्यावी. भाजीचा हिरवा आणि पांढरा दोन्ही भाग यामध्ये घ्यायचा आहे. कढईत तेल गरम करुन मोहरी, हळद, हिंग घालावे. मिरची आणि लसूण घालून एक मिनीट ती परतावी. त्यानंतर चिरलेला कांदा घालून दोन तीन मिनिटे परतल्यानंतर चिरलेली भाजी घालून झाकण ठेवून शिजवा. भाजी अगदी सुकी वाटली, तर थोडे पाणी शिंपडा. आवश्यकतेनुसार साखर, मीठ, नारळ घालून एकत्र करा. पुन्हा दोन मिनिटे शिजवावी. तयार भाजी पोळी, भाकरी, भातासोबत वाढून घ्या.
*अळू*
अळू ही तशी सर्व घरात प्रसिध्द असणारी भाजी आहे. अळूच्या वड्या या सर्वांना विशेष स्वाद देवून जातात. शेंगदाणे, चणा डाळ किमान दोन तास पाण्यात भिजत घालावी. नंतर कुकरमध्ये एक किंवा दोन शिट्या घेवून शिजवून घ्यावे. अळूची पाने धुवून पुसून घ्यावीत. देठ वेगळी काढावीत आणि सोलून घ्यावीत. देठांसह पाने बारीक चिरुन घ्यावीत. कढईत तेल गरम करुन मोहरी, हिंग, हळद, तिखट घालून फोडणी करावी. त्यामध्ये चिरलेला अळू घालावा. चवीपुरते मीठ घालून झाकण ठेवून पाच मिनिटे शिजवून घ्यावे. आवश्यकतेनुसार पाणी शिंपडावे. चिंचेचा कोळ घालून पुन्हा तीन ते चार मिनिटे शिजू द्यावे. पाण्यामध्ये बेसनचे केलेले मिश्रण कढईत घालून ढवळावे.
त्यानंतर शिजवलेली चणाडाळ आणि शेंगदाणे घालावेत. गरजेनुसार पाणी गोडा मसाला, गुळ घालावा. एक चांगली उकळी काढून भाकरी, गरमागरम तूप भाताबरोबर तिचा आस्वाद घ्यावा.
*- प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते*
*जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी*
*मो. क्र. 9403464101*