
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयांवर कठोर कारवाई – प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी.
रत्नागिरी, दि. १६ -: अनुसूचित जाती प्रवर्गातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांकडून शुल्क वसूल करणाऱ्या किंवा कागदपत्रांची अडवणूक करणाऱ्या महाविद्यालयांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा समाज कल्याण मुंबईचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची आज दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयाच्यावतीने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत सन २०२४-२५ मधील ज्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज अद्याप प्रलंबित आहेत, ते सर्व अर्ज ३० जुलै पर्यंत निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, सन २०२५-२६ साठीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन स्वीकारण्याबाबतचे वेळापत्रक देण्यात आले असून, विद्यार्थ्यांनी वेळेत आपले अर्ज भरून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्या कार्यालयाकडे ऑनलाईन प्रणालीद्वारे सादर करावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या.
काही महाविद्यालयांकडून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांकडून शुल्क वसूल करणे, तसेच शिष्यवृत्ती जमा न झाल्याने विद्यार्थ्यांना गुणपत्रक किंवा शाळा सोडल्याचा दाखला (TC) न देणे, अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत असल्याचे श्री. सोळंकी यांनी नमूद केले. अशा गैरव्यवहार करणाऱ्या महाविद्यालयांवर कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत समाज कल्याण साहायक आयुक्त दीपक घाटे, समाज कल्याण निरीक्षक रविंद्र कुमठेकर आणि श्रुती कांबळे यांनी मार्गदर्शन केले.