
अडीच वर्षांचा काळ खूप चांगला गेला रत्नागिरीच्या मावळत्या अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड
रत्नागिरी : अपर पोलिस अधीक्षक म्हणून अडीच वर्षाचा काळ खूप चांगला गेला. रत्नागिरीचा आधीचा अनुभव होताच. रत्नागिरी निसर्गरम्य आहेच पण इथल्या लोकांचे सहकार्यही चांगले मिळाले. भविष्यात संधी मिळाली तर रत्नागिरीत एसपी म्हणून यायला आवडेल, असा मानस रत्नागिरीच्या मावळत्या अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी निरोप घेताना व्यक्त केला.जयश्री गायकवाड गेल्या अडीच वर्षांपासून रत्नागिरीच्या अपर पाेलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या. काही वर्षांपूर्वी त्यांनी रत्नागिरीत उप विभागीय पोलिस अधिकारी म्हणूनही जबाबदारी उत्तम प्रकारे सांभाळली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची कोल्हापूर येथील सीआयडी विभागाच्या पोलिस अधीक्षकपदावर बदली झाली आहे.
सोमवारी सायंकाळी गुन्हेविषयक आढावा बैठकीच्या वेळी पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत अपर पाेलिस अधीक्षक गायकवाड यांना निरोप देण्यात आला. यावेळी गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना रत्नागिरीतील अनुभवांचा आवर्जून उल्लेख केला. त्या म्हणाल्या, रत्नागिरीतील लाेक चिकित्सक असल्याने एखादी घटना किंवा माहिती देताना त्यांना अभ्यास करूनच उत्तर द्यावे लागायचे. त्यामुळे आपल्याही त्यातून सखोल माहिती आपोआपच मिळायची. मुळातच इथले लोक शांत असल्याने क्राईम रेशो कमी असल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला.कामाच्या स्तरावर आलेल्या अनुभवाबाबत जयश्री गायकवाड म्हणाल्या की, माझ्या या अडीच वर्षांच्या कारकीर्दीत दोन महत्त्वाच्या निवडणुका, बारसू आंदोलन, चंपक मैदान येथील घटना अशा अनेक आव्हानात्मक घटना योग्यरित्या हाताळल्याने अडचण आली नाही. प्रत्येक वेळी वरिष्ठांचे मार्गदर्शनाने घडत गेले. पण त्याचबरोबरच माझ्या सहकारी अधिकाऱ्यांनाही घडविण्याची संधी मिळाली.
शेवटी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या निसर्गसौंदर्याचे आणि इथल्या लोकांचे काैतुक करतानाच भविष्यात पोलिस अधीक्षक म्हणून पुन्हा रत्नागिरीत येण्याची संधी मिळाली तर नक्कीच आवडेल, अशी इच्छा व्यक्त केली. यावेळी पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, नूतन अपर पोलिस अक्षीक्षक बाबुराव महामुनी, पोलिस उप अधीक्षक (गृह) राधिका फडके, तसेच सर्व विभागांचे पोलिस निरीक्षक, उप निरीक्षक, सर्व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.