- राज्यातील पालिका तसेच अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. त्या निवडणुकांच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाची सुनावणी होणार आहे. शिंदे गटाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाणाचा वापर करण्यापासून रोखा, अशी विनंती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी न्यायालयाला केली आहे. त्यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यासाठी न्यायालय तयार झाले आहे. 2022 मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाण हे पक्षचिन्ह व शिवसेना हे नाव वापरण्यास मुभा दिली. निवडणूक आयोगाचा तो निर्णय मुळात असंवैधानिक आहे, असा दावा शिवसेनेने केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे नाव व धनुष्यबाण चिन्ह वापरण्यास मनाई करा, लोकसभा व विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणात दिलेल्या अंतरिम आदेशाप्रमाणे शिवसेना पक्षाचे नाव व चिन्हाबाबत अंतरिम आदेश द्या, अशी विनंती शिवसेनेतर्फे वरिष्ठ वकील देवदत्त कामत यांनी 2 जुलैला केली होती.
Back to top button