
आरजू कंपनी गंडा घालून गेली, फसवणूक झालेले लोक आता १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार.
स्थानिक गरजू लोकांना व्यवसाय उद्योग सुरू करून देतो असे सांगून त्यांना मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीस भाग पाडून त्यानंतर त्यांची फसवणूक करून आरजू कंपनीने आपला गाशा गुंडाळला होता. या कंपनीत रत्नागिरी शहर व आजुबाजूच्या परिसरातील मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या माध्यमातून पैसे गुंतवले होते. मात्र कंपनीने त्यांना कोणत्याही प्रकारे रोजगार उपलब्ध न करून देता व त्यांचे गुंतवलेले पैसे परत न करता मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली होती. आरजू कंपनीच्या घोटाळ्यात सर्वसामान्य लोकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली होती. या प्रकाराला आता दोन वर्ष उलटूनही या घोटाळ्यातील मुख्य आरोपी अद्यापही सापडलेला नाही. त्यामुळे फसवणूक झालेल्या लोकांच्या पैशाबाबत कोणताही निर्णय होत नसल्याने आता फसवणूक झालेल्या ग्राहकांच्यावतीने विलास सुर्वे, गौतम गमरे हे १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडणार आहेत. याची माहिती दिपराज शिंदे यांनी दिली आहे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून फसवणूक झालेल्या ग्राहकांचे पैसे मिळविण्यासाठी पावले उचलावित अशी जनतेची मागणी आहे.