
आजीची भाजी रानभाजी पोटदुखीसाठी खावा पानांचा ओवा भात वरण सोबत भाजी सुरण
आदिवासी जमातीत दैनंदिन आहारात रानभाज्यांचा उपयोग करीत असतात. ऋतूमानानुसार या रानभाज्या त्यांना सहज उपलब्ध होत असतात. त्यामुळे रानभाज्यांची संपूर्ण माहिती त्यांना असते. या पारंपरिक अन्नाविषयीचे ज्ञान नव्या पिढीपर्यंत त्यांच्यामधून सहजरित्या पोहोचते. काही विशिष्ट सणादिवशी काही वनस्पतींचा वापर ते आहारात आर्वजून करतात. यामधून त्यांची निसर्गाशी जुळलेली नाळ गडद होत जाते. भाज्यांचा रस्सा तयार करण्यापासून, तर उकळून, भाजून, वरण, भाजी आदी खाद्यपदार्थ तयार केले जातात. सुमारे चौदा वनस्पती या मधुमेह, पोटदुखी, खोकला आदींवर औषधी म्हणून तर काही वनस्पती गर्भवती आणि बालकांसाठी अतिशय उपयुक्त ठरल्या आहेत. ‘आजी आणि तिची रानभाजी’ ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि मानवी आरोग्य समृध्द करणारी तिची रानभाजी या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे. अशा रानभाज्यांची ओळख करुन देणारी *’आजीची भाजी रानभाजी’ ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी* यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सुरु केलेल्या या मालिकेत आजची रानभाजी आहे पानांचा ओवा आणि सुरण..

प्रथम पानांचा ओवा याबद्दल माहिती घेवू. या वनस्पतीच्या पानांचा ओव्यासारखा वास येतो. या वासावरुन या रानभाजीचे नाव पानांचा ओवा असे पडले आहे. या वनस्पतीची लागवड बागेत केली जाते. पिण्याच्या पाण्याला सुवासिक वास येण्यासाठी तसेच औषधामध्ये हिच्या पानांचा वापर केला जातो. मानवी जीवनाप्रमाणे गुरांसाठी औषध म्हणून देखील वापरतात. पोटदुखी, अपचन, पोटशूळ यामध्ये एखादे पान दिल्यास गुणकारी ठरते. दमा, जुनाट खोकला यामध्ये देखील पानांचा ओवा प्रभावी ठरतो.
एका पातेल्यात या वनस्पतीच्या खुडलेली पाने पेलाभर पाण्यात उकळून घ्यावीत. त्यानंतर त्यामधील पाणी निथळू द्यावे. कढईत फोडणीसाठी तेल गरम करुन त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसूण, जिरे, तिखट, मीठ, हळद, टोमॅटो तळून घ्यावेत. नंतर त्यामध्ये भाजी टाकून शिजू द्यावी. कोथिंबीर टाकून भाजी खाण्यास तयार. हिच्या पानांपासून भजीदेखील उत्तमरित्या बनवता येतात.

*सुरण* *आजची दुसरी भाजी आहे सुरण. बहुदा ती सर्वांच्या परिचयाची आहे. चित्रपट अभिनेता राजेश खन्ना याच्या ‘बावर्ची’ या चित्रपटात देखील सुरणच्या भाजीच्या आर्वजून उल्लेख आलेला आहे.

सुरण हे कंद म्हणून जसे उपयुक्त आहे, तसे मूळ आणि पानेदेखील उपयुक्त आहेत. अ, ब, क ही जीवनसत्वे यात आहेत. लोणच्याच्या स्वरुपातील कंद हा वायुनाश करतो, असे समजले जाते. आतड्यांच्या रोगात सुरणाची भाजी गुणकारी आहे. तसेच दमा, मूळव्याध, पोटदुखी, हत्तीरोग व रक्तविकारासाठी उपयुक्त ठरते.

एका पातेल्यात सुरण, चिंचेचा पाला, पेरुचा पाला व मीठ घालून उकळून घ्यावे. नंतर सुरणाचे तुकडे करुन घ्यावेत. कढईमध्ये तेल गरम करुन, त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसूण, जिरे, तिखट, मीठ, हळद व मसाला टाकून तळून घ्यावे. नंतर त्यात सुरणाचे तुकडे घालून शिजवून घ्या. वरुन कोथिंबीर टाकून तयार झालेल्या भाजीचा आस्वाद घ्यावा. *- प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते* *जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी* *मो. क्र. 9403464101*