
हातलोट घाटाच्या सुधारणा कामाला गती! रत्नागिरी-सातारा जिल्ह्यांतील अंतर लक्षणीय कमी होणार.
खेड :* पर्यटनदृष्ट्या आणि प्रशासकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या हातलोट घाट रस्त्याच्या सुधारणा व रुंदीकरणाच्या कामाला आता गती मिळणार आहे. रत्नागिरी व सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या या घाटरस्त्याच्या प्रलंबित कामांबाबत विधानभवनात नुकतीच उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सक्रिय पुढाकार घेत मांडणी केली, तर अध्यक्षस्थानी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले होते.या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत वनविभागाची आवश्यक जमीन संपादन करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच तांत्रिक सल्लागार नेमण्याचा ठरावही करण्यात आला असून, उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत मंत्र्यांनी ग्वाही दिली.गेल्या अनेक वर्षांपासून हातलोट घाटाचे काम विविध कारणांनी रखडले होते. तत्कालीन मंत्री रामदास कदम व छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांनंतरही प्रगती मंदावली होती. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पाठपुरावा केला होता. आता राज्यमंत्री योगेश कदम यांच्या पुढाकारामुळे घाट रस्त्याचे काम निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे.खेड-बिरमणी-हातलोट मार्ग पूर्णत्वास गेला तर रत्नागिरी-सातारा जिल्ह्यांतील अंतर लक्षणीय कमी होणार आहे. महाबळेश्वर परिसरातील तसेच खेड तालुक्यातील दुर्गम गावांना मुख्य रस्त्याशी जोडणारा हा मार्ग स्थानिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हा घाट कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा सर्वात जवळचा पर्यायी मार्ग ठरणार आहे.पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनही हा मार्ग लाभदायक ठरणार असून, स्थानिक अर्थव्यवस्था, व्यापार आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळण्याची शक्यता आहे. नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत “काम लवकर पूर्ण करावे” अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.