
स्पर्धेमुळे एक सामाजिक एकात्मता आणि कृषी प्रेरणा देखील रूजते-पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत
संगमेश्वर येथे बळीराजा वाढावेसराड पावस्कर वाडी व शिवसेना तालुका संगमेश्वर यांच्या वतीने आयोजित सामूहिक नांगरणी व भात लावणी स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थित राहून आपल्या मातीतल्या श्रमप्रतिष्ठेला आणि पारंपरिक पद्धतींना सलाम केला.
या अनोख्या स्पर्धेच्या निमित्तानं माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. अशी स्पर्धा असली की मी शाळा चुकवायचो, पण ही स्पर्धा नाही चुकवायचो! आज तिथेच उभं राहून ते दिवस पुन्हा अनुभवले, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितले.
संयम, चिकाटी आणि जिद्द यांच्या कसोटीवर उतरलेले स्पर्धक हेच आपल्या ग्रामीण भागाचे खरे हिरो आहेत. कोकणातील पारंपरिक शेती पद्धतींचा सन्मान जपत, या स्पर्धेमुळे एक सामाजिक एकात्मता आणि कृषी प्रेरणा देखील रूजते, असे देखील मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.
मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी या मंचावरून एक अत्यंत आनंदाची बातमी सांगितली –छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील ११ गडकिल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट झाले आहेत! हा आपल्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. आता जगभरात शिवरायांचा इतिहास अभ्यासला जाईल आणि त्यांच्या गडकिल्ल्यांना जागतिक गौरव प्राप्त होईल. याच पार्श्वभूमीवर, आपल्या संगमेश्वर परिसरातील छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणीसुद्धा अंतिम टप्प्यात आहे. लवकरच त्या स्मारकाच्या बांधकामास अधिकृत सुरुवात होणार आहे. ही बातमी सांगतानाही मन अभिमानाने भरून आलं.
या सुंदर स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे, आयोजकांचे मनःपूर्वक आभार.या स्पर्धेची परंपरा अशीच टिकावी आणि कोकणातला बळीराजा पुढे जात राहावा हीच प्रामाणिक इच्छा, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी नमूद केले