
अवकाळी पावसाचा फटका, थंडीचा जोर ओसरणार
राज्यात तुरळक ठिकाणी गारपिट आणि अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. आजही तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं किमान तापमानात वाढ होत असून गारवा मात्र कमी होण्याची चिन्हे आहेत.आज दिवसभरात किमान तापमानात चढ-उतार होताना दिसत आहेत. पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळं अग्नेय अरबी समुद्रापासून उत्तर कोकणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. दक्षिण केरळ लगतच्या अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून 3.1 किमीच्या उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रीय आहे.
उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी झाला आहे. त्यामुळं राज्यातील थंडी कमी होत आहे. मुंबईतही अवकाळी पावसामुळं तापमानात वाढ झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारपिटीने तडाखा दिला. तर अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींना हजेरी लावली. राज्यात पुढील काही दिवस तापमानात चढ-उतार पाहायला मिळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र येत्या तीन ते चार दिवसांत पुन्हा एकदा थंडीची तीव्रता वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.